

कोल्हापूर; सतीश सरीकर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यानुसार 31 पैकी सर्वच प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गातील 1 महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. उर्वरीत 8 किंवा 9 महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मंगळवारी कागदोपत्री पूर्तता केली जाईल.
महापालिका निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने होत आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. जात प्रवर्गाच्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी 12 जागा राखीव आहेत. तर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 जागेचे आरक्षण मिळणार आहे. प्रभागातील लोकसंख्या व संबंधित जात प्रवर्गाची लोकसंख्या यानुसार महापालिका प्रशासनाने या जागांचे आरक्षण निश्चित केले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील 12 पैकी 6 महिलांचे आरक्षण चिठ्ठ्या टाकून काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 1 जागा आरक्षित असल्याने त्याठिकाणी पुरुष किंवा महिला असे चिठ्ठी टाकून आरक्षण निश्चित केले जाईल. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी महिला आरक्षण निश्चित झाल्यास उर्वरीत 39 महिलांसाठी आरक्षण निघेल. अन्यथा एकूण 46 महिलांचे आरक्षण पूर्ण करण्यासाठी 40 महिलांसाठी आरक्षण काढण्यात येईल. त्यासाठी 31 पैकी सर्वच 31 प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे प्रत्येकी एक प्रभागात आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. परिणामी सर्वसाधारण प्रवर्गातील उरलेल्या 8 किंवा 9 महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात येणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 31 प्रभागात प्रत्येकी एका जागेचे आरक्षण टाकण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील 12 पैकी 6 महिला असल्याने 6 प्रभागात त्या महिलाही असतील. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्यास त्या ठिकाणी महिला असेल. अशाप्रकारे 7 प्रभागात तीनपैकी महिला आरक्षण असतील. उर्वरीत 24 किंवा 25 प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गातील 8 किंवा 9 महिलांसाठी चिठ्ठ्या टाकून आरक्षण टाकले जाणार आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एका प्रभागात जास्तीत जास्त दोन महिलांचे आरक्षण असावे. कोणत्याही प्रभागात तिन्ही महिलांचे आरक्षण असणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला आरक्षण कसे काढावे? याविषयी मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत. लोकसंख्येनुसार आरक्षण काढण्यासाठी सूत्र ठरवून दिले आहे. त्याचा अभ्यास करून दै. 'पुढारी'तून महापालिका निवडणुकीत 31 पैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कोणते 12 प्रभाग आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी कोणता 1 प्रभाग राखीव राहील ते प्रसिद्ध करण्यात आले होते. 15 मे रोजी दै. पुढारीत 'मनपा निवडणुकीचे आरक्षण निश्चित' हे प्रसिद्ध झालेले वृत्त तंतोतंत खरे ठरले.
अनुसूचित जातीसाठीचे प्रभाग…
प्रभाग क्र. : 1, 4, 5, 7, 9, 13, 15, 18, 19, 21, 28, 30
अनुसूचित जमातीसाठीचे प्रभाग…
प्रभाग क्र. – 2
सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे प्रभाग…
प्रभाग क्र – 3, 6, 8, 10, 11, 12, 14, 16, 17, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 31