हनुमान जन्मस्थळ वाद : साधू-महंतांसह ग्रामस्थांचा रास्ता रोको, गोविंदानंदांचा रथ बंदोबस्तात नाशिककडे | पुढारी

हनुमान जन्मस्थळ वाद : साधू-महंतांसह ग्रामस्थांचा रास्ता रोको, गोविंदानंदांचा रथ बंदोबस्तात नाशिककडे

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
तीन दिवसांपासून हनुमान जन्मस्थळ हे कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद हे त्र्यंबकेश्वर मुक्कामी होते. ते सोमवारी (दि. 30) सकाळी नाशिककडे प्रस्थान करणार होते. मात्र, त्यांच्या निषेधासाठी अंजनेरी ग्रामस्थांसह त्र्यंबकेश्वरचे साधू-महंत जमणार असल्याची खबर मिळाल्याने गोविंदानंद यांनी प्रस्थानाच्या वेळेत बदल केला. त्यामुळे संतप्त हनुभानभक्तांनी नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आंदोलन करीत रास्ता रोको केला. दुपारी पोलिस बंदोबस्तात गोविंदानंद हे रथासह नाशिककडे रवाना झाले.

स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचा निषेध करण्यासाठी अंजनेरीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जवळपास तासभर दुतर्फा रास्ता रोको केला होता. महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज, महंत उदयगिरी महाराज, महंत ब—ह्मगिरी महाराज, सिद्धेश्वरानंद, श्रीनाथानंद यांच्यासह माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे तसेच मधुकर लांडे, राजाराम चव्हाण, गणेश चव्हाण, राजेंद्र बदादे आदींनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. त्यामुळे र्त्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक कविता फडतरे, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आंदोलकांनी आपले म्हणणे पोलिस अधिकार्‍यांना सांगितले. तसेच आमच्याकडे हनुमान जन्मस्थानाचे पुरावे आहेत. मात्र आम्ही ते का म्हणून गोविंदानंद यांना दाखवावे, असा सवालही उपस्थित केला.

बाहेरच्या राज्यातून आलेला एक साधू येथे मुक्कामी राहतो आणि परिसराचे वैभव असलेल्या अंजनेरी असलेल्या हनुमान जन्मस्थळास हरकत घेतो यावर शासन यंत्रणा काही बोलत नाही. त्यामुळे येथे वातावरण बिघडले तर जबाबदार कोण?, असा सवालही याप्रसंगी संतप्त नागरिकांनी पोलिसांना विचारला.

माझ्यावरील तक्रार संकुचित बुद्धीचे लक्षण : गोविंदानंद सरस्वती
त्र्यंबकला पाच दिवस होतो, पण त्यावेळी कोणीही विरोध केला नाही. ज्याच्याकडे माझा रथ गेला नाही त्यांना वाईट वाटले. त्यांनीच माझ्याविरोधात पोलिस तक्रार करण्याचा इशारा दिला, अशी माहिती हनुमान जन्मस्थळावरून वादग्रस्त विरोध करणारे गोविंदानंद सरस्वती यांनी दिली. नाशिकरोड येथे मंगळवारी होणार्‍या धर्मसंसदेसाठी ते नाशिक येथे आले आहेत. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. हनुमान जन्मस्थळ वादाबद्दल ते म्हणाले की, हनुमान यांच्या ठिकाणावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यावरून एकमत व्हावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या धर्मसंसदेचा तोच उद्देश आहे. हा प्रश्न सर्वांच्या सहमतीने मिटावावा, असे आमचे म्हणणे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

नाशिकरोडला आज धर्मसंसद….
रामभक्त हनुमान यांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.31) नाशिकरोड येथील महर्षी पंचायतन सिद्धपीठम आश्रमात सकाळी अकरा वाजता धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महंत श्री स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी दिली.

कष्किंधा (कर्नाटक) येथील गोविंदानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत ही धर्मसंसद होईल. गोविंदानंद सरस्वती यांनीच काही दिवसांपूर्वी नाशिक येथील अंजेनेरी पर्वत येथे हनुमानाचे जन्मस्थान नसल्याचे म्हटले होते. तर त्यांनी कर्नाटक येथील किष्किंधा येथे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला होता. त्यामुळे नाशिक येथील साधू, महंत तसेच हनुमान भक्तांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील गोविंदानंद सरस्वती यांच्या दाव्याचा विरोध केला आहे.

हेही वाचा :

Back to top button