‘खेलो इंडिया’योग स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून स्नेहल पेंडसे पंच | पुढारी

‘खेलो इंडिया’योग स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून स्नेहल पेंडसे पंच

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  ‘खेलो इंडिया’अंतर्गत योग स्पर्धेसाठी पंच म्हणून महाराष्ट्रातून एकमेव सोलापूरच्या स्नेहल पेंडसे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

केंद्र शासनाच्या पुढाकारातून होणार्‍या ‘खेलो इंडिया’ अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा प्रकारात यंदा प्रथमच योगासनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘खेलो इंडिया’च्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यावर्षीपासून योगाच्याही स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धा 4 ते 6 जून दरम्यान हरियाणा येथील पंचकुला येथे होणार आहेत. या स्पर्धांसाठी देशभरातून विविध राज्यांतून पंच निवडण्यात आले.

यात संपूर्ण महाराष्ट्रातून सोलापूरच्या स्नेहल पेंडसे यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. स्नेहल पेंडसे गेल्या 30 वर्षांपासून योगाचे धडे सोलापूरकरांना देत आहेत. नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशनच्या जनरल बॉडी मेंबर म्हणून कार्यरत आहेत. तसेच सोलापूर जिल्हा योग परिषदेच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Back to top button