रस्ता राग हाच रोग | पुढारी

रस्ता राग हाच रोग

अच्छा बाबा, चलतो.
गाडी नेतोयस?
नाही, आज हेलिकॉप्टर न्यावं म्हणतो.
झाली इथंपासूनच कटकट सुरू?

कटकट कसली? तुम्हीतरी कसे प्रश्न विचारताय बघा ना! रोज गाडी घेऊनच ऑफिसला जातो ना मी?
तू जातोस रे; पण तू घरी येईपर्यंत इथे मी गॅसवर असतो.
का? मी नव्याने चारचाकी चालवायला शिकतोय?
ती येतेच रे; पण त्याहून फार जास्त राग येतो तुला.
येणारच ना! काय आपले रस्ते, ट्रॅफिक. माणसं कशी चालवतात वाहनं?

अजून रस्त्यावर उतरला नाहीस तोवर तुझी बडबड सुरू.
तुम्ही गाडी चालवून बघा या रस्त्यावर, म्हणजे कळेल. कोण डावीकडून ओव्हरटेक करेल, कोण सिग्नल तोडून अंगावर आदळेल, कोण भर गर्दीच्या रस्त्यात ठोंब्यासारखा उभा राहील, काही नेम नाही.
असं तुला वाटतं. आमच्यासारख्या पादचार्‍यांना वाटतं, कोण अंगावर गाडी घालेल काही नेम नाही.
आपल्याकडे नाहीतरी गाडीचालकच गुन्हेगार ठरतो शेवटी.
बाबारे, कोणाच्या शेवटाला कारण होऊ नकोस म्हणजे मिळवलीस. काही होत नाही. एखादा अपघात झालाच तर तीस-पस्तीस वर्षं नखालाही धक्का लागत नाही. फार मोठी शिक्षा तर दूरच.
हे नवज्योतसिंगवरून म्हणतोयस ना तू?

संबंधित बातम्या

अर्थातच बाबा. त्यांनी 88 साली रस्त्यावर हाणामारी केली होती. शिक्षा कधी होतेय? यंदा.
बरोबरच आहे. रस्त्यावरच्या ह्यांच्या फुकटच्या दांडगाईमुळे जे कोणी 65 वर्षांचे गृहस्थ हकनाक बळी गेले, त्यांचे कुटुंबीय का गप्प बसतील नाही का?
जाऊ द्या हो बाबा. जाणारा गेला म्हणून सिद्धूबाबांना काही धक्का लागला का? मजेत क्रिकेट खेळले, मध्ये कधीतरी माध्यमांमध्ये परीक्षक म्हणून मिरवले, कधीतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, काय कमी झालं ह्यांचं?

हं. झालं खरं काहीसं असं.
पुढेही हेच चालू राहील. थातुरमातुर शिक्षा भोगतील की पुन्हा हे स्क्रीनवर मोठ्यांदा हसायला आणि थुकरट जोकबिक टाकायला मोकळे.
न्यायव्यवस्थेची दिरंगाई हा वेगळा विषय आहे चिरंजीव. आणि आपल्या कक्षेबाहेरचाही आहे. तुम्हा वाहनचालकांची रस्त्यावरची चिडचिड कमी करा हे सांगतोय मी.
मग रस्ते सुधारा, वाहतूक सुधारा.
हेही पुन्हा आपल्या कक्षेबाहेरचंच ना बेटा? आपल्यापुरतं बोलूया. रस्ता राग, रस्त्यावर डोक्यात तिडिक जाणं, इंग्रजीत रोड रेज म्हणतात ते, ह्याला मात्र आळा घालायलाच हवा. हा एक प्रकारचा मानसिक रोगच आहे बरं.

बस्का? आता मला मनोरुग्ण ठरवताय? तेवढंच राहिलं होतं.
नाही रे. फक्त जरा सबुरीने घ्यायला सांगतोय. वाहनं शांत डोक्याने चालवावीत रे. एका चालकाची तिडिक चार पादचार्‍यांना महागात पडू शकते. नंतर निस्तरण्यापेक्षा आधीच अपघात टाळले तर?
…तर आपला नवज्योतसिंग सिद्धू होणार नाही!
– झटका

Back to top button