जळगाव : घरफोडी, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास अटक | पुढारी

जळगाव : घरफोडी, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याबाबत आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी पथक नियुक्त करुन गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील एका तरुणास अटक केली. त्याने आजवर १३ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्याकडून ४ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरात गस्ती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली होती. नीरज देविप्रसाद शर्मा (रा. फरकाबाद, उत्तरप्रदेश) नावाच्या इसमाने जळगाव शहरात अनेक घरफोडीचे गुन्हे केले आहेत. बऱ्याच मोटारसायकल चोरलेल्या आहेत. तो सध्या शिव कॉलनी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे लागलीच शिव कॉलनीत जावून नीरज देविप्रसाद शर्मा याचा शोध घेतला. यावेळी तो एका विना नंबरच्या मोटार सायकलवर फिरत असल्याचे निदर्शनास आले.

पळून जाताना केले जेरबंद

पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पथकाने त्याचा पाठलाग करुन मुसक्या आवळल्या. त्याला नाव-गाव विचारुन लायसन्स व मोटार सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली. यावर त्याने लायसन्स नसल्याचे सांगून मोटारसायकल मित्राची असल्याचे सांगितले. मित्राचे नाव व मोबाईल नंबर विचारला असता यावेळी त्याने उडवाउडवीचे दिली. या उत्तरावरून त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनमध्ये आणून अधिक चौकशी केली. यावेळी ही मोटार सायकल मुक्ताईनगर पिंप्राळा हुडको येथून चोरी केल्याची माहिती दिली.

१३ घरफोड्यांची दिली कबुली

आरोपीने जळगाव शहरातील खोटे नगर, मुक्ताईनगर, मानराज पार्क परिसर, पिंप्राळा परिसर भागात घरफोड्या केल्याबाबत कबुली दिली. तसेच जिल्हापेठ, रामानंदनगर आणि जळगाव तालुका पोलिस ठाण्यात एकूण १३ गुन्हे घरफोडी चोरीचे उघडकीस आले. एकूण ४ मोटार सायकल, सोन्याचे दागिने, ३ टीव्ही संच, कॉम्प्यूटर, लॅपटॉप, इन्व्हर्टर, बॅटरी, भांडे व इतर मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीविरुध्द यापूर्वी सन २००७ मध्ये जिल्हापेठ पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा

Back to top button