नाशिक : मनपात महिला आरक्षणाच्या 67 पैकी ‘इतक्या’ जागांसाठी सोडत | पुढारी

नाशिक : मनपात महिला आरक्षणाच्या 67 पैकी 'इतक्या' जागांसाठी सोडत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के महिला आरक्षण याप्रमाणे नाशिक महापालिकेत 67 जागा महिलांच्या ताब्यात जाणार असून, 43 प्रभागांत प्रत्येकी एक आणि एका प्रभागात दोन याप्रमाणे 45 महिलांचे आरक्षण असेल, तर उर्वरित 22 जागांच्या आरक्षणाची सोडत पद्धतीने काढण्यात येणार असून, एससी, एसटी आणि सर्वसाधारण जागांचा समावेश असेल.

राज्य निवडणूक आयोगाने दि. 14 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर पाठोपाठ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी प्रभागनिहाय जागा निश्चित करण्यासाठी दि. 31 मे रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या राखीव जागांसाठी सोडत निघणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, तूर्तास ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. गेल्या सोमवारी (दि.23) निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, एससी, एसटीसह खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण कसे असणार, याबाबत इच्छुकांसह इतरही राजकीय पक्षांतील नागरिकांचे लक्ष लागून आहे. 133 जागांपैकी 50 टक्के म्हणजे 67 जागा या महिलांसाठी राखीव असतील. एकूण 44 प्रभाग असून, त्यापैकी 43 प्रभाग तीनसदस्यीय, तर एक प्रभाग हा चारसदस्यीय असेल. यातील 43 प्रभागांत प्रत्येकी एक महिला आणि एका प्रभागातील चारपैकी दोन जागा या महिलांसाठी असतील. याप्रमाणे 45 जागा महिलांसाठी गेल्यानंतर उर्वरित 22 जागांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण टाकण्यात येणार आहे. त्यात एससी, एसटी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांचा समावेश असेल. त्यामुळे संबंधित 22 जागांमुळे अनेक प्रभागांत दोन-दोन महिलांचे आरक्षण पडणार असल्याने पुरुष उमेदवारांच्या अडचणींत वाढ होणार आहे. अनुसूचित जातीसाठी 19 प्रभाग, तर जमातीकरिता 10 प्रभाग राखीव असून, त्यातील 50 टक्क्यांप्रमाणे महिला आरक्षण असेल.

हेही वाचा :

Back to top button