नाशिक : लोंबकळणार्‍या तारांच्या घर्षणाने घराला आग; लाखोंचे नुकसान | पुढारी

नाशिक : लोंबकळणार्‍या तारांच्या घर्षणाने घराला आग; लाखोंचे नुकसान

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
बंद घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना वडाळा गावात सोमवारी (दि.23) घडली. रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

वडाळा येथे प्रदीप कारभारी सोनवणे यांचे जुने सागवानी लाकडाचे घर असून, त्याला सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. तेव्हाच वाहणार्‍या जोरदार वार्‍यांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी आग शमविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. परंतु, त्यात यश न आल्याने अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा आग आटोक्यात आली, तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळेच आग लागल्याचा आरोप रहिवाशांनी केला. गावात विजेच्या तारा लोंबकळत असून, त्यांच्या घर्षणाने ठिणगी पडल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते. वार्‍यामुळे आग इतरत्र पसरण्याच्या भीतीने नागरिकांची धावपळ उडाली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी घराचे लाखांचे नुकसान झाले. पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

धोकादायक तारांचा प्रश्न – दरम्यान, महावितरण कंपनीने भिलवाड, खर्डा 33/11 केव्ही उपकेंद्राअंतर्गत येणार्‍या वाजगाव, खर्डा, कनकापूर, वडाळा, शेरी, वार्शी, काचणे परिसरात वीज वाहिन्यांना अडचणीची ठरणारी झाडेझुडपे तोडण्याचे काम हाती घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही वडाळा येथे शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना घडली. मग ही कामे नक्की झाली की नाही, जीवितहानी झाल्यावर कंपनीला जाग येईल का ? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. लोंबकळत असलेल्या विद्युततारा दुरुस्त कराव्यात, अशी मागणी वडाळ्याचे गोरख सोनवणे यांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button