

आजरा; पुढारी वृत्तसेवा : आजरा शहरापासून जवळ असणार्या सुलगाव तिट्यावर मंगळवारी सायंकाळी टस्कर हत्तीने दर्शन दिले. यामुळे सुलगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. चार दिवसांपूर्वी टस्कर सायंकाळी म्हसोबा देवालयाजवळ रस्त्याशेजारी उभा होता. टस्करमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. वर्दळीमुळे हा टस्कर पुन्हा जंगलात परतला होता. टस्करने सुलगावच्या शिवाजी डोंगरे यांच्या शेतातील उसाचे नुकसान केले.
सायंकाळी टस्करने सुलगाव तिट्यावरून रस्ता ओलांडत आनंदा घंटे यांच्या दुकानाजवळून पुन्हा शेतात जाऊन नुकसान पिकांचे केले आहे. त्यानंतर हिरण्यकेशी नदीपात्रात डुंबत असताना नागरिकांनी त्याला पाहिले आहे. हा टस्कर वारंवार या परिसरात फिरत असल्यामुळे परिसरातील नागरिक चिंतेत आहेत.
दरम्यान, दुसर्या हत्तीकडून आजरा तालुक्यातील वेळवट्टी येथे सोमवारी रात्री नुकसान केले. रात्री तीनच्या सुमारास बाळू शिंदे यांच्या घराशेजारी हत्तीने नुकसान केले. यामध्ये शिंदे यांची नारळाची सहा झाडे मुळासकट उसपून टाकली. तसेच अन्य नागरिकांच्याही झाडांचे नुकसान
केले.