नाशिक : शहरात जबरी चोर्‍या; साडेसहा लाखांवर डल्ला | पुढारी

नाशिक : शहरात जबरी चोर्‍या; साडेसहा लाखांवर डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी जबरी चोरी, घरफोडी, चोरी करून सहा लाख 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बस प्रवासादरम्यान, दोन वृद्ध व्यक्तींकडील महागडे मोबाइल व किमती ऐवज चोरीस गेला असून, इतर घटनांमध्ये दोन दुचाकीही चोरल्या आहेत. त्याचप्रमाणे एका गुन्ह्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या संशयितास पंचवटी पोलिसांनी पकडले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील दीपाली राजू चौधरी या दत्तमंदिर स्टॉपच्या दिशेने शनिवारी (दि.21) रात्री पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी दीपाली यांच्या गळ्यातील 75 हजार रुपयांची अडीच तोळे वजनाची पोत ओरबाडून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, पोलिस तपास करीत आहेत. दुसर्‍या घटनेत येवलेकर मळा परिसरात राहणार्‍या मनीष अशोक बडवे (41) यांच्या घरी 20 ते 22 मेदरम्यान, चोरट्याने घराच्या टेरेसचा दरवाजा तोडून घरातील चार लाखांचा ऐवज लंपास केला. त्यात 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, दोन मोबाइल, चांदीची भांडी व देव असा ऐवज आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत. कल्याण येथील खडकपाडा येथील रहिवासी लता सुधाकर सोनार (68) या महामार्ग बसस्थानकात बसमध्ये बसत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लता यांच्याकडील 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. लता या रविवारी (दि.22) बसमध्ये बसत असताना चोरट्याने लता यांच्या पर्समधून दोन मोबाइल, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 15 हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. तर दिंडोरी रोडवरील श्रीरामनगर परिसरात चोरट्याने सुदर्शन थानचंद विग (73) हे रविवारी (दि.22) बसप्रवास करत असताना चोरट्याने त्यांच्या बॅगेतील 50 हजार रुपयांचे दोन आयफोन चोरून नेले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस तपास अधिक करीत आहेत, तर प्रवीण परमेश्वरन नायर (41, रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, 10 मे रोजी चोरट्याने घरात शिरून मोबाइल, ब्ल्युटूथ व लॅपटॉप असा 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

दोन दुचाकी लंपास – सातपूर येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीबाहेरील पार्किंगमधून चोरट्याने राकेश ज्ञानेश्वर नेरपगार (27, रा. डीजीपीनगर) यांची 35 हजार रुपयांची दुचाकी रविवारी (दि. 22) दुपारी चोरून नेली. या प्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत. तर दुसर्‍या घटनेत राहुल रंगनाथ टिळे (30) यांच्याकडील 10 हजार रुपयांची दुचाकी दि. 18 मे रोजी सिन्नर फाटा येथून चोरून नेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

एटीएममध्ये छेडछाड – पंचवटी कारंजा येथील पिंपळगाव को-ऑप. बँकेच्या एटीएम केंद्रात एकाने चोरी करण्याचा प्रयत्न केला. संशयित जॉन एस. फद्दू (35, रा. हैदराबाद) याने रविवारी (दि. 22) दुपारच्या सुमारास एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून पैसे चोरट्याचा प्रयत्न केला. ही बाब उघड होताच पंचवटी पोलिसांनी धाव घेत संशयिताला पकडले. त्याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button