नाशिक : तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पोर्टल; समाज कल्याणचा पुढाकार | पुढारी

नाशिक : तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पोर्टल; समाज कल्याणचा पुढाकार

नशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाकडून तृतीयपंथीयांच्या विकास योजनांसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तृतीयपंथी व्यक्तींना https:transgender.dosje.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

राष्ट्रीयस्तरावरील पोर्टलवरील नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासह राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध होण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण, विकासाच्या विविध योजना तसेच जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रशासनाकडून सांस्कृतिक संमेलन / कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी समाज कल्याण विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, पुणे येथे नुकतेच तृतीयपंथी समूहाचे सामाजिक सहभाग, स्वावलंबन, आरोग्य, स्वयंरोजगार नोंदणी यासंदर्भात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणेरी प्राइड संस्था, मैत्र क्लिनिक, गायत्री परिवार, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थान, आयुष विभाग, आरोग्य मंत्रालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, इस्कॉन आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. या स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या साहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

30 मे रोजी नाशिकला विशेष शिबिर – तृतीयपंथीयांसाठी राज्यात दि. 23 मे ते 14 जून या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच तृतीयपंथीय व्यक्तींना तत्काळ प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून दिले जात आहे. नाशिक विभागात दि. 30 मे ते 3 जून या दरम्यान, तर नाशिक जिल्ह्यासाठी दि. 30 मे रोजी हे विशेष शिबिर होणार आहे.

राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी (माहिती) उपलब्ध होण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तृतीयपंथीय व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणार्‍या समाजातील सर्व घटकांनी यासाठी सहकार्य कारावे. – डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण विभाग.

हेही वाचा :

Back to top button