आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आ. अनिल बाबर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने नगरपंचायतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आटपाडीला नगरपंचायत करण्याची अधिसूचना आणि परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हा बँकेेचे संचालक तानाजी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पाटील म्हणाले, आटपाडी येथे नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यात आ. बाबर व आम्ही आटपाडीला नगरपंचायत करण्याची मागणी केली होती. मंत्री शिंदे यांनी या मागणीची लवकरच पूर्तता करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार मंत्री शिंदे यांनी अवघ्या दहा दिवसात घोषणेची अंमलबजावणी केली. आटपाडी शहर, मापटेमळा आणि भिंगेवाडी या गावांचा समावेश नगरपंचायतीमध्ये केला आहे. आटपाडी ग्रामपंचायतीमधून शेंडगेवाडी गाव वगळून ते बनपुरी गावाला जोडले आहे. नगरपंचायतच्या निर्णयाबद्दल मंत्री शिंदे यांचे मुंबईत जाऊन आभार मानणार आहे.
ते म्हणाले, आता आटपाडी शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. मुख्य पेठेत सिमेंट रस्ता, पाण्याची चांगली व्यवस्था, भुयारी गटार, अंडरग्राऊंड स्ट्रीट लाईट या व अन्य अंतर्गत सुविधेसाठी मोठा निधी देण्याची मागणी करणार आहे. मंत्री शिंदे यांनी आटपाडी नगरपंचायतीला रोल मॉडेल सिटी म्हणून ओळखली जाईल, असा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यानुसार प्रस्ताव देऊन आटपाडीचा चेहरामोहरा बदलू. यावेळी साहेबराव पाटील, धनंजय पाटील, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
आटपाडीत आनंदोत्सव..
दरम्यान सोमवारी आटपाडी नगरपंचायतीबाबत निर्णय जाहीर झाल्यानंतर आटपाडीकरांनी चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.