नाशिक : मनपा आयुक्त अॅक्टिव ; शहरातील कामकाजाच्या पाहणीसाठी सहा भरारी पथके | पुढारी

नाशिक : मनपा आयुक्त अॅक्टिव ; शहरातील कामकाजाच्या पाहणीसाठी सहा भरारी पथके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील विकासकामे मार्गी लागावीत, शहराची स्वच्छता होऊन आरोग्य उत्तम राहावे आणि प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे, यादृष्टीने मनपा आयुक्त रमेश पवार यांनी पावले उचलली असून, सहा विभागीय कार्यालयांसह रुग्णालये, शाळा, सुरक्षा विभागांना अचानक भेटी देऊन पाहणी करण्यासाठी सहा पथकांची नेमणूक केली आहे. या सहा पथकांमध्ये चार उपआयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्तांचा सभावेश असणार आहे. आरोग्य, शिक्षण, सुरक्षा विभाग आणि मनपाचे सहा विभागीय कार्यालये या चारही विभागांत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी व डॉक्टरांची यादी भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

शहरातील परिसरासह रस्त्यांची स्वच्छता होते की नाही, मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांत येणार्‍या नागरिकांची कामे होतात की नाही, विद्यार्थ्यांना दिली जाणारी सेवा, लेटलतिफ कर्मचार्‍यांवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने भरारी पथके अचानक भेटी देणार आहेत. आयुक्त रमेश पवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून दररोज शहरातील विविध ठिकाणांची तसेच कामांची पाहणी करीत अधिकार्‍यांची कानउघाडणी केली आहे. या दौर्‍यात आयुक्तांकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून पवार यांनी प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने आता आपले लक्ष वळविले असून, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, सुरक्षा विभाग तसेच घनकचरा विभाग यातील कामकाजाची पाहणी करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली असून, त्यात कार्यरत अधिकारी, कर्मचार्‍यांची यादी तसेच त्यांच्या कामकाजाच्या वेळा आणि कामकाजाचे ठिकाण याची सविस्तर माहिती विभागप्रमुखांकडून मागविली आहे. त्यानंतर खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत पवार यांनी चार उपआयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त अशा एकूण सहा पथकांची स्थापन करून अचानक भेटी देण्याचे आदेश दिले आहेत.

विभागीय अधिकार्‍यांना कारवाईचा इशारा
आयुक्त पवार यांनी महापालिकेच्या सहाही विभागीय अधिकार्‍यांना जादा अधिकार देऊन कामकाज गतिमान होण्याच्या दृष्टीने पावले टाकली खरी. परंतु, त्यानुसार गेल्या आठवड्यात कोणी किती व कशी कामे केली, याबाबत माहिती विचारताच, त्याबाबत कोणीही माहिती सादर करू शकले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी सहाही विभागीय अधिकार्‍यांना खडेबोल सुनावत कारवाईचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button