नाशिक : काझीगढी येथे तातडीने उपाययोजना राबवण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाचे महापालिकेला पत्र | पुढारी

नाशिक : काझीगढी येथे तातडीने उपाययोजना राबवण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाचे महापालिकेला पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जुन्या नाशिकमधील काझीगढी येथे तातडीने उपाययोजना राबवाव्या, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नाशिक महापालिकेला पत्राद्वारे केल्या आहेत. या पत्राला महापालिका प्रशासन कसा प्रतिसाद देते हे पाहावे लागेल.

दरवर्षी मान्सूनच्या आगमनापूर्वी शहरातील धोकादायक वाडे आणि मालमत्तांचा प्रश्न ऐरणीवर येतो. अशा मिळकतींना महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेला विषय म्हणजे जुन्या नाशिकमधील काझीगढी होय. अंदमानात यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले आहे. राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी वर्दी दिली आहे. त्यामुळेच मान्सूनचा वेग बघता जिल्हा प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारीवर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून शहरातील काझीगढीबाबत प्रशासनाने महापालिकेला पत्र पाठवित तातडीने उपाययोजनांसाठी सूचना केल्या आहेत. महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काझीगढीवरील रहिवाशांना नोटिसा बजावण्याची औपचारिकता पूर्ण करते. तसेच नोटीसद्वारे जीवित अथवा वित्तहानी झाल्यास स्थानिक जबाबदारी असतील, असे सांगत मनपा जबाबदारीमधून त्यांची मान सोडवून घेते. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नाशिक महापालिकेला पत्रव्यवहार करीत काझीगढीप्रश्नी तत्काळ उपाययोेजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

जागा सोडण्यास स्थानिकांचा नकार – जुन्या नाशिकमध्ये उंचावर असलेल्या काझीगढीचा परिसर भुसभुशीत झाला असून, पावसाळ्यात त्याला धोका संभवतो. 2013 मध्ये पावसाळ्यात तेथील जमीन काही प्रमाणात खचल्याने भर पावसात 25 स्थानिक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले होते. त्यानंतर गढीला संरक्षक भिंत बांधण्याचा पर्याय पुढे आला. पण निधी व अन्य तांत्रिक बाबींमध्ये ही भिंत अडकली. त्याचवेळी तेथील स्थानिक रहिवासी मात्र जागा सोडण्यास तयार नाहीत.

हेही वाचा :

Back to top button