स्पेशल आय. जी. लोहिया यांची डॉ. जाधव यांच्याशी चर्चा | पुढारी

स्पेशल आय. जी. लोहिया यांची डॉ. जाधव यांच्याशी चर्चा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी शनिवारी दै. ‘पुढारी’ कार्यालयात भेट घेऊन कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.

प्रारंभी दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने ‘पुढारी भवन’ येथील त्यांच्या पुतळ्यास विशेष पोलिस महानिरीक्षक लोहिया यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहिली.

दै. ‘पुढारी’चे सर्वसामान्य वाचकांच्या मनात असलेले अढळ स्थान, रणभूमीवरील सियाचीन हॉस्पिटल उभारणीत दै. ‘पुढारी’चे योगदान याबाबत लोहिया यांनी प्रशंसनीय भावना व्यक्त केल्या. डॉ. प्रतापसिंह जाधव व डॉ. योगेश जाधव यांच्याशी विविध विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

कोल्हापूर परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अधिक चांगली राहावी, यासाठी पोलिस दलांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पोलिस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद वाढविण्यावर आपले प्राधान्य राहिले आहे. पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रात नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही त्यांनी डॉ. जाधव यांच्याशी बोलताना सांगितले.

Back to top button