नाशिक : बालविवाह रोखण्यासाठी अंगणवाडीसेविका करणार प्रबोधन | पुढारी

नाशिक : बालविवाह रोखण्यासाठी अंगणवाडीसेविका करणार प्रबोधन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बालविवाह रोखणे ही यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी आहे. अंगणवाडीसेविकांनी किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावे व महिला बचत गटांच्या मासिक सभा, ग्रामसभा यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन करत लोकसहभागातून बालविवाह थांबवण्यासह बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात महिला व बालकल्याण विभाग आणि युनिसेफ या संस्थेच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड अध्यस्थानी होत्या. ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येत काम करावे, अंगणवाडी सेविकांनी बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे, असे निर्देश या बैठकीत दिले.

युनिसेफच्या सीमा कानोळे यांनीदेखील बालकांशी निगडित योजना या कशा प्रकारे राबवाव्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकने यासंदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजीव म्हसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ आदी उपस्थित होते.

दोन बालविवाह रोखले…
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावमध्ये साडेचौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलगी व साडेवीस वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा विवाह महिला व बालविकास विभागाने रोखला. प्रशासनाने हळदीच्या दिवशी अल्पवयीन मुलगा-मुलगी व दोघांचे कुटुंबीय यांचे समुपदेशन करून हा विवाह थांबवला, असे त्र्यंबकेश्वरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांनी सांगितले. निफाड तालुक्यातल्या तारुखेडले या गावातील 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असताना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांचे समुपदेशन करीत विवाह रोखला, अशी माहिती निफाड तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button