पुणे : पुढारी वृत्तसेवा
विविध सेवा वाहिन्यांसाठी व इतर कामांसाठी शहरातील रस्त्यांवर सुरू असलेली खोदाई थांबवून 10 जूनपर्यंत रस्ते पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. रस्त्यांसाठी 65 कोटींच्या निविदा काढण्यात आल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर विविध सेवा वाहिन्या व इतर कामांसाठी शासकीय व खासगी संस्थांना खोदाईस परवानगी दिली जाते. यातून महापालिकेला महसूलही मिळतो. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून रस्ते पूर्ववत करणे बंधनकारक केले जाते. चालू वर्षी महापालिकेने 15 हजार 557 रनिंग मीटर खोदाईला परवानगी दिली आहे.
यामध्ये केबल खोदाईसाठी 10 हजार 117 रनिंग मीटर, पाण्याच्या पाईपलाईनसाठी 1 हजार 960 रनिंग मीटर, डेनेज लाईनसाठी 2 हजार 50 रनिंग मीटर, एमएनजीएल कंपनीला 2 हजार 294 रनिंग मीटर आणि इतर कामांसाठी 205 रनिंग मीटर खोदाईस परवानगी दिली आहे. ही खोदाई 30 मेपर्यंत पूर्ण करून 10 जूनपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
अतितातडीच्या खोदाईसाठी महापालिका आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामध्ये अत्यावश्यक कामांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने शहरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण नियोजन केले आहे. मुख्य खात्याकडून ही रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी 65 कोटीच्या निविदा काढण्यात आल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.