नाशिक : बॉडी वॉर्न कॅमेर्‍यांचा वाहतूक पोलिसांना विसर | पुढारी

नाशिक : बॉडी वॉर्न कॅमेर्‍यांचा वाहतूक पोलिसांना विसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : बदलत्या तंत्रज्ञानासोबत पोलिसांनीही स्वत:सह त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षांपूर्वी शहर वाहतूक पोलिसांना सुमारे 130 बॉडी वॉर्न कॅमेरे मिळाले होते. मात्र, काही दिवस त्यांचा वापर झाल्यानंतर हे कॅमेरे दिसेनासे झाले आहेत. या कॅमेर्‍यांमुळे वाहतूक पोलिसांना फायदा होणार होता. तसेच कारवाई करताना कोणी हुज्जत घातल्यास त्याच्याविरोधात कायदेशीर पुरावा म्हणून या बॉडी वॉर्न कॅमेर्‍यांची मदत झाली असती. मात्र, या कॅमेर्‍यांचा वापरच होत नसल्याने लाखो रुपयांचे कॅमेरे वापराविना पडून आहेत.

शहरातील वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेने वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे. त्यात नियमबाह्य वाहने चालविणार्‍या चालकांवर कारवाई करताना, अनेकदा वाहतूक पोलिसांसोबत वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. काही चालकांकडून पोलिसांनाच धक्काबुक्की, मारहाणीचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेतील पोलिसांसाठी सुमारे 18 लाख रुपये खर्च करून, त्यांना 125 बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले होते. त्याआधी पोलिसांकडे पाच बॉडी वॉर्न कॅमेरे होते. त्यापैकी 26 कॅमेरे पोलिस ठाण्यांना वितरीत करण्यात आले होते. या कॅमेर्‍यांमुळे वाहतूक पोलिसांवर होणार्‍या आरोपांची शहानिशा होण्यास मदत होणार होती. कॅमेर्‍यांमुळे वाहतूक शाखेच्या कामात पारदर्शकता येईल, असे वाटले होते. मात्र, कॅमेरे मिळाल्यापासून एकदाही या कॅमेर्‍यांचा ठोस वापर झाल्याचे बघावयास मिळाले नाही. तत्कालीन अधिकार्‍यांच्या पाहणीत ज्या वाहतूक पोलिसांकडे बॉडी वॉर्न कॅमेरे होते, त्यांच्यासोबत बेशिस्त वाहनचालकांनी वाद घातल्याचे आढळले नव्हते. त्यामुळे हे कॅमेरे पोलिसांसाठीच फायदेशीर ठरत होते. मात्र, कालांतराने या कॅमेर्‍यांच्या वापराकडे दुर्लक्ष झाले.

असा आहे कॅमेरा : या कॅमेर्‍यांची रेकॉर्डिंग क्वालिटी तीन मेगापिक्सल होती. त्यामध्ये डे-नाइट रेकॉर्डिंग करण्याची सुविधा आहे. कॅमेर्‍यात 2900 एमएएच बॅटरी आहे. त्यामुळे एकावेळी सलग आठ तास रेकॉर्डिंग करता येऊ शकेल. कॅमेर्‍याची स्टोअरेज क्षमता 32 जीबी इतकी असून, कॅमेरे आयपी 67 वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ क्वालिटीचे आहेत. वादाचे प्रसंग उद्भवल्यास अथवा गरज असल्यास कॅमेरे सुरू करण्यात येतात.

वादविवादाचे प्रसंग उद्भवल्यास बॉडी वॉर्न कॅमेरे उपयोगात येत असतात. न्यायालयातही ते पुरावे म्हणून सादर केले जातात. मात्र, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईऐवजी समुपदेशन केले जात असल्याने वादविवादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नसल्याने कॅमेर्‍यांचा वापर कमी झाला आहे. – पौर्णिमा चौगुले, उपआयुक्त, शहर वाहतूक शाखा.

हेही वाचा :

Back to top button