

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
वाढत्या उष्म्यामुळे कोल्हापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून सातत्याने वाढणार्या तापमानाने रविवारी उच्चांक गाठला. कमाल तापमान तब्बल 41 अंशांकडे पोहोचल्याने (40.3) दिवसभर नागरिकांची लाही लाही झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, 2019 नंतरचे मे महिन्यातील हे सर्वाधिक उच्चांकी तापमान आहे.
एप्रिल महिन्यापासून अधूनमधून वळवाचा पाऊस झालेला असला, तरी गेल्या आठवडाभरात कोल्हापूरच्या तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी कमाल तापमानात 4 अंशांची वाढ होऊन पारा 40.3 अंशावर; तर आर्द्रता 54 नोंदविली गेली. उन्हाचा तीव— तडाखा, त्यात आर्द्रतेची भर पडल्यामुळे शहरवासीय घामाघूम झाले होते. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह देशभरात पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव— लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या उष्णतेच्या लाटेचा फटका कोल्हापूरलाही बसत आहे. अननस, मोसंबी, कलिंगड, कोकम सरबत, लिंबू पाणी, उसाचा रस, आईस्क्रिम, ज्यूससह विविध शीतपेयांची विक्री शहरासह जिल्ह्यात वाढली आहे. दुपारच्या वेळेत शरीरातून घामाच्या धारा निघत असल्याने नागरिकांना एसी आणि फॅनचा आधार घ्यावा लागत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळले जात आहे. येत्या आठवड्यात ढगाळ वातावरणासह तापमान 38 ते 39 अंशांपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
2019 नंतर पहिल्यांदाच…
2019 नंतर प्रथमच मे महिन्यातील कोल्हापूरचे तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. याआधी 20 मे 2019 रोजी पारा 41.2 अशांपर्यंत गेला होता.
देशात काही भागांत पारा जाणार 45 अंशांवर
पुणे : पुढारी वृत्तसेवा
मान्सूनच्या आगमनाची वर्दी आलेली असली, तरी आणखी चार दिवस उन्हाची काहिली देशवासीयांना सहन करावी लागणार आहे. उत्तरेकडून महाराष्ट्रापर्यंत उष्णतेच्या लहरी सक्रिय होत आहेत. सोमवारपासून गुरुवारपर्यंत ही लाट देशात राहणार आहे.
उष्णतेचा पारा 42 ते 45 अंशांवर जाण्याचा इशारा हवामान खात्याने रविवारी दिला. महाराष्ट्रात सर्वसाधारण तापमानात वाढ होईल, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्म्याचा 'अलर्ट' देण्यात आला आहे. हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवात तसेच उत्तर प्रदेश व बिहारमध्ये वार्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने उत्तर भारतात उष्ण लहरी सक्रिय होत आहेत. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आल्याने तिकडून दमट वारेवाहत आहेत. या दोन्हीचा परिणाम म्हणून आगामी चार दिवस देशभर उष्णतेची लाट तीव— होणार आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात व महाराष्ट्र यात भाजून निघणार आहे. या राज्यांतील कमाल तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होऊन ते 42 ते 45 अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
42 ते 45 अंश तापमानाची राज्ये
राजस्थान, महाराष्ट्र (विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र), मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, रायलसीमा, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड.