वय वाढते, पण उंची घटते! | पुढारी

वय वाढते, पण उंची घटते!

आबूधाबी : ठराविक वयानंतर माणसाची उंची घटू शकते का? या प्रश्‍नाचे उत्तर आता होय, असेच आहे. विज्ञानाच्या नजरेतून पाहिल्यास वयाच्या 18 ते 20 वर्षांपर्यंत शरीराची उंची वाढत असते. त्यानंतर ती काही वर्षे स्थिर राहते. मात्र, वयाच्या 30 ते 40 वर्षांनंतर शरीर उतार वयाकडे झुकू लागते. जसजसे वय वाढत जाते, तसे शरीराची उंचीही घटू लागते. असे पुरुष व महिला या दोहोंमध्ये होते.

घरातील वयस्क सदस्यांना पाहिल्यास लक्षात येते की, त्यांचे शरीर आकुंचन पावू लागले आहे. असे असले तरी शरीराच्या उंचीत हाडांची भूमिका फार मोठी असते. मात्र, वय जसे वाढत जाते, तसे हाडांची क्षमता घटू लागते. ‘सायन्स एबीसी’च्या अहवालानुसार वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होत असल्याचे दिसून येते. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे उंची घटणे. आयुष्यातील प्रत्येक 10 वर्षांत शरीरात काही ना काही बदल झालेला दिसून येतो.

मानवी शरीराच्या उंचीमध्ये पायांची हाडे, पाठीचा कणा आणि खोपडीची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. वाढत्या वयानुसार पायांची हाडे व खोपडीवर काहीच परिणाम होत नाही. मात्र, पाठीच्या कण्याची उंची कमी होऊ लागते. यामध्ये असलेली डिस्क पातळ होऊ लागते. म्हणजेच वाढत्या वयाचा परिणाम सर्वसामान्यपणे शरीराच्या उंचीवर झालेला दिसून येतो. हा परीणाम पुरूष व स्त्रीमध्येही दिसतो.

Back to top button