नाशिकमध्ये 27 मनसे कार्यकर्ते हद्दपार | पुढारी

नाशिकमध्ये 27 मनसे कार्यकर्ते हद्दपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.4) पहाटे शहरातील काही मशिदींसमोर भोंगे लावण्याचा, घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. या प्रकरणी पोलिसांनी 30 हून अधिक मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यापैकी 27 जणांना न्यायालयाने 15 दिवसांसाठी शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तर दुसरीकडे शहरातील बहुतांश मशिदींमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविनाच देण्यात आली.

मशिदींवरील भोंग्यांवरून अजान दिली गेल्यास 4 मेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केले होते. त्यामुळे शहर पोलिसांनी खबरदारी म्हणून मंगळवारी (दि.3) शंभरहून अधिक मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी 16 जणांना 4 ते 8 मेदरम्यान शहराबाहेर जाण्याचे बजावण्यात आले होते. मध्यरात्री 2 पासूनच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. मात्र, तरी बुधवारी पहाटे मनसे कार्यकर्त्यांनी काही मशिदींसमोर भोंगे लावण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मशिदीजवळ गोळा होत घोषणाबाजी केली. जुने नाशिक परिसरातील मशिदीसमोरील मंदिरावर अज्ञात व्यक्तीने भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा भोंगा जप्त केला. सातपूर, जुने नाशिक परिसरातही मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचे, भोंगे लावल्याचे आढळून आले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन, सरकारवाडा, सातपूर व इंदिरानगर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक-एक असे पाच गुन्हे दाखल करून सुमारे 30 हून अधिक जणांना अटक केली आहे. दरम्यान, शहरातील बहुतांश मशिदींमधून बुधवारी (दि.4) पहाटे भोंग्यावरून अजान देण्यात आली नाही. त्यानंतरच्या चार अजान मात्र भोंग्यांद्वारे देण्यात आल्या.

27 जण हद्दपार : गुन्हे दाखल करून मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना 4 ते 18 मेपर्यंत शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात सहा महिलांचाही समावेश आहे.

यांच्यावर हद्दपारीची कारवाई :

भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या सुजाता डेरे, कामिनी दोंदे, अक्षरा घोडके, अरुणा पाटील, निर्मला पवार, स्वागता उपासनी या महिला पदाधिकार्‍यांना हद्दपार केले आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अर्जुन वेताळ, ललित वाघ, देवचंद केदारे, नितीन माळी, मेघराज नवले, कैलास मोरे, बबलू ठाकरे, अजिंक्य शिर्के, तुषार जगताप, भूषण सूर्यवंशी, पंकज दातीर, प्रफुल्ल आपटे, राजेश परदेशी, विजय आगळे यांनाही हद्दपार केले आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सचिन भोसले, मनोज घोडके, सत्यम खंडाळे, अमित गांगुर्डे, संतोष कोरडे, निखिल सरपोतदार व संजय देवरे यांना हद्दपार करण्यात आले आहे. तर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली असून, दोघे फरार आहेत. अटक केलेल्या संशयितांना गुरुवारी (दि.5) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button