89 तलवारी व खंजीर वाहतूक प्रकरणातील आणखी दोघांना अटक | पुढारी

89 तलवारी व खंजीर वाहतूक प्रकरणातील आणखी दोघांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई आग्रा महामार्गावरून हत्यारांची अवैध वाहतूक केल्या प्रकरणात धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जालना येथून आणखी दोघांना अटक केली आहे. हत्यारांचा साठा राजस्थान मधून आला असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे राजस्थानच्या हत्यार तस्कराच्या मुसक्या आवळण्यासाठी पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यातील सोनगिरी शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एम एच 09 एम 00 15 या क्रमांकाच्या कारला अडवून चौकशी केली असता या कारमध्ये 89 तलवारी आणि एक खंजीर असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी जालना येथे राहणारे मोहम्मद शरीफ मोहम्मद शफी, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद सय्यद रहीम आणि कपिल विष्णू दाभाडे या चौघांना अटक केली. या चौघांची चौकशी केली असता त्यांनी राजस्थान राज्यातील चितोड येथून हा शस्त्रसाठा खरेदी केला असून तो जालना येथे नेला जात असल्याची माहिती पुढे आली.

या चौघांना वाहन आणि पैसा उपलब्ध करून देणाऱ्या दोघांची नावे पुढे आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी जालना येथून खालिद बासद व साजिद पठाण या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जालना येथे जात असल्याने पोलिसांनी राजस्थान येथील व्यापार्‍याला अटक करण्यासाठी पथक रवाना केले आहे.

हेही वाचा :

Back to top button