नाशिक : तुमचा इंटरेस्ट कशात, हे मला माहीत आहे ; माणिकरावांचा ‘इंटरेस्टिंग चिमटा’ | पुढारी

नाशिक : तुमचा इंटरेस्ट कशात, हे मला माहीत आहे ; माणिकरावांचा ‘इंटरेस्टिंग चिमटा’

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर
शहरात अतिक्रमणे, पार्किंग आणि भाजीबाजाराचा प्रश्न जटील झाला आहे. पण, तुम्ही त्याबाबतीत काहीच करीत नाहीत. शहराला शिस्तप्रिय करण्यासारख्या गोष्टींत तुम्हाला ‘इंटरेस्ट’ नाही. पण, तुमचा ‘इंटरेस्ट’ कशात आहे हे मला माहीत आहे, असे म्हणत आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुख्याधिकारी संजय केदार यांना भर बैठकीत चिमटा काढला. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. हा चिमटा ‘अर्थ’पूर्ण होता, अशी चर्चा बैठकीनंतर उपस्थितांमध्ये रंगली होती. या ‘इंटरेस्टिंग चिमट्या’ची परिसरात चांगलीच चर्चा झाली.

शहरातील पाणीटंचाईसोबतच विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी नगर परिषदकार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला नगर परिषदेतील पाणीपुरवठा, बांधकाम, नगररचनासह वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते. काही माजी नगरसेवकदेखील आपापल्या प्रभागातील प्रश्न घेऊन या बैठकीत आसनस्थ झाले होते. कडवा धरणातून राबविलेल्या पाणीपुरवठा योजनेतील दोष दुरुस्तींबाबत चर्चा झाल्यानंतर आमदार कोकाटे यांनी शहरातील विस्कळीतपणाला हात घातला. शहरासह भाजीबाजारात अस्ताव्यस्तपणा असून, पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. अतिक्रमणे वाढू लागली आहेत. वाहतूक कोंडीने डोके वर काढले असताना मुख्याधिकारी म्हणून केदार यांनी हे प्रश्न हाताळून त्यात सुसूत्रता आणायला हवी, असे आमदार कोकाटे यांचे म्हणणे होते. मात्र, तसे काहीच घडत नसल्याने त्यांनी मुख्याधिकार्‍यांना ‘इंटरेस्टिंग चिमटा’ काढला. तो ‘अर्थ’पूर्ण होता, अशी चर्चा बैठकीनंतर उपस्थितांमध्ये रंगली होती. या दरम्यान उपस्थितांमध्ये खसखस तर पिकलीच, पण मुख्याधिकारी केदार यांनाही हसू लपवता आले नाही.

आमदार कोकाटे आणि मुख्याधिकारी केदार यांचे सूत जुळत नसल्याची चर्चा बर्‍याच दिवसांपासून आहे. त्याला वेगळा कंगोरा असल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते. मध्यंतरीच्या काळात नगर परिषदेत मुख्याधिकारी बदलाचा खेळ रंगला होता. मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांच्या बदलीनंतर संजय केदार यांनी मुख्याधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली होती. तथापि, काही दिवसांतच केदार यांची बदली झाली आणि दिलीप मेनकर यांनी सिन्नरची जागा पटकावली. या सगळ्यात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून आले. स्थानिक सेना नेत्यांनी बदलीचे गार्‍हाणे थेट ‘मातोश्री’पर्यंत नेल्याचे बोलले गेले. त्यानंतर पुन्हा मेनकर यांची उचलबांगडी झाली आणि केदार यांनी मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. कालपरत्वे या अदलाबदलीच्या राजकारणावर पडदा पडला. पण, मुख्याधिकार्‍यांच्या माथी एका गटाचा शिक्का बसला. त्यामुळे अधूनमधून मुख्याधिकारी व विद्यमान आमदारांच्या समर्थकांमध्येही खटके उडताना दिसतात. पदोन्नती मिळाल्यानंतर मुख्याधिकारी केदार पुन्हा इथल्याच खुर्चीत बसले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे चिमटे, टोमणे, कोपरखळ्या यापुढेही ऐकायला मिळतील की, मुख्याधिकारी आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार वर उल्लेखलेल्या प्रश्नांवर उपाय करतील, हे पाहावे लागणार आहे.

तुम्ही पुढच्या पाच वर्षांच्या वर्क ऑर्डर दिल्यात’
याच बैठकीत शहर परिसरातील काही उपनगरांसाठी वाढीव जलवाहिनी व जलकुंभाचे नियोजन करावे, अशी मागणी नामदेव लोंढे, शीतल कानडी यांनी केली. त्यावर आमदार कोकाटे यांनी पाण्याच्या टँकरचा खर्च विचारात घेता या उपाययोजना प्राधान्याने करणे आवश्यक असल्याचे सूचित केले. तथापि, मुख्याधिकार्‍यांनी नपा फंडातील निधीची अनुलब्धता अधोरेखित केली. त्यावर पुन्हा आमदार कोकाटे यांनी ‘नपा फंडाचा विषय मला सांगू नका, त्यातून तुम्ही पुढच्या पाच वर्षांच्या वर्क ऑर्डर ठेकेदारांना देऊन ठेवल्या आहेत’, असा टोमणा मारला. तसेच ‘या कामांचे एस्टिमेट तयार करा. निधीची काळजी करू नका, उपलब्ध करायला मी समर्थ आहे’ असेही ठणकावून सांगितले. त्यावरदेखील दालनात हास्याचे कारंजे उडाले.

हेही वाचा :

Back to top button