व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य | पुढारी

व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य

28 एप्रिल हा दिवस ‘जागतिक व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्त…

रस्त्यावर होणारे अपघात दिवसागणिक वाढतच आहेत; पण कामाच्या ठिकाणी होणारे अपघातही संख्येने कमी नाहीत. विजेच्या खांबावर चढून काम करत असताना आजही अनेक लाईटमन खाली पडून जागीच मृत्युमुखी पडतात. मोठ्या गटारी किंवा भुयारी चेंबर साफ करत असताना गुदमरून मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या आजही कानावर येतात. अनेक कारखान्यांमध्ये कुठल्या तरी यंत्रात सापडून कुणाचे हात निकामी होतात. गोदाम किंवा दुकानाला अचानक आग लागून बाहेर पडता न आल्याने काहींचा गुदमरून मृत्यू होतो.

व्यवसायाच्या ठिकाणी होणार्‍या अपघातात कामगार बळी पडतात. विकलांग होतात. अनेकदा लहान-मोठ्या इजांना सामोरे जातात, तर काहींना मानसिक धक्का बसतो. 28 एप्रिल हा दिवस ‘जागतिक व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. दरवर्षी जगभरात कामाच्या ठिकाणी अपघातात होणार्‍या मृत्यूचे प्रमाण जवळपास 23 लाख इतके प्रचंड आहे. याचाच अर्थ दररोज सहा हजार तीनशे व्यक्ती कामाच्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात, तर जगभर कामाच्या ठिकाणी होणार्‍या अपघातांचे प्रमाण दरवर्षी तब्बल 31 कोटी इतके प्रचंड आहे. दररोज साडेआठ लाख, तर दर सेकंदाला 10 इतके अपघात होतात. अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू होतो. कुटुंबीयांसाठी तर तो मोठाच आघात असतो. संबंधित व्यवसायाच्या ठिकाणी कामात तरबेज असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे व्यवसायावरही परिणाम होतो.

जेव्हा कामाच्या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होतात, तेव्हासुद्धा कामाचे रुटीन बिघडून जाते. अपघाताचा परिणाम इतर सहकार्‍यांवर होतो. व्यवसायाचा वेग मंदावतो. अपघातग्रस्त झालेली संबंधित व्यक्ती काही दिवस कामावर येऊ शकत नाही. अशा व्यक्तीला झालेली शारीरिक इजा ही दीर्घकालीन असू शकते. काही वेळा अपंगत्व येऊ शकते. अपघातामुळे झालेल्या शारीरिक इजा आणि आजारपण यावर मोठा खर्च होऊ शकतो. अशा सर्व बाजूंनी नुकसान होते. यासाठी कामाच्या प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने वागणे महत्त्वाचे असते. आपण हाताळत असलेल्या वस्तू, अवजारे किंवा आधुनिक यंत्रसामग्री यांची नीटपणे माहिती करून घ्यायला हवी. कामाच्या ठिकाणचे प्रमुख, मालक किंवा व्यवस्थापक यांनी नवीन व्यक्तीची कामावर निवड करताना कामाची पद्धत संपूर्णपणे समजावून द्यावी. वेगवेगळ्या विभागांची माहिती द्यावी. सर्व यंत्रसामग्रीची ओळख नवीन व्यक्तीला करून द्यावी.

ती यंत्रसामग्री कशी हाताळावी, याबद्दलचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्या व्यक्तीला द्यावे. बर्‍याचदा या गोष्टी होताना दिसत नाहीत. कामाचे ठिकाण हे संपूर्णपणे सुरक्षित पद्धतीने बांधून घेतले आहे की नाही? अशा योग्य वायुवीजन आहे की नाही? आज-काल शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणचे फायर ऑडिटसारख्या बाबींची पूर्तता संबंधित व्यवस्थापनाने केली, तर अपघात टळू शकतात आणि अपघातामुळे होणारी हानीसुद्धा कमी तीव्र होऊ शकते. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्शुरन्स. कामाच्या ठिकाणची इमारत आणि अशा ठिकाणी होणारे अपघात, नैसर्गिक आपत्ती, आग, वादळ, भूकंप अशांमुळे होणारे अपघात आणि वित्तहानी या सर्वांसाठी विम्याचे संरक्षण घेतले आहे की नाही, हे महत्त्वाचे असते, तसेच दरवर्षीचा हप्ता त्या-त्यावेळी भरला आहे की नाही, हे पाहणेही गरजेचे असते. कामाच्या व्यापात मालक किंवा व्यवस्थापकीय मंडळ यांचे याकडे बर्‍याचदा दुर्लक्ष होताना दिसते.

कामगारांसाठी असणार्‍या सुरक्षा आणि आरोग्य कायद्याचा अभ्यास संबंधितांनी करणे आवश्यक आहे. त्या कायद्यानुसार कामगारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे सक्तीचे असते, याची आठवण करून देण्यासाठी 28 एप्रिल हा दिवस ‘जागतिक व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. संबंधित सरकारी यंत्रणांनी प्रत्येक व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन या गोष्टींची अंमलबजावणी होते आहे की नाही, याची पडताळणी करणे आवश्यक आहे.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे जगात कोरोनाचे आगमन झाल्यापासून सर्वत्र एक प्रकारची आरोग्य जागृती झाली. कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी किंवा कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अनेक सूचना आल्या. यातील बहुतांश सूचना किंवा नियम हे व्यवसायाच्या ठिकाणी लागू करण्यात आले. विषाणूसंसर्ग रोखणे हा त्यामागचा हेतू असला, तरी एकंदरीतच विविध प्रकारच्या अपघातांपासून सर्व कर्मचार्‍यांच्या संरक्षणाच्या द़ृष्टीने त्या महत्त्वाच्या होत्या. यानिमित्ताने व्यावसायिक सुरक्षा आरोग्याच्या द़ृष्टीने अधिक बळकट करण्याच्या द़ृष्टीने पावले उचलली जाऊ लागली आहेत.

या दिनाच्या निमित्ताने जागतिक कामगार संघटनेतर्फे ‘सामाजिक संवादा’ला अग्रस्थान देण्यात आले आहे. ‘सामाजिक संवाद’ म्हणजे सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संघटना आणि व्यावसायिक ठिकाणी काम करणारे कर्मचारी, कामगार आणि त्यांचे संघटक यांच्यातील परस्पर संवाद, वाटाघाटी, विचारविनिमय आणि कामगारांना भेडसावणार्‍या समस्यांवर उकल शोधण्यासाठी उचललेले पाऊल, जेणेकरून भविष्यात व्यावसायिक सुरक्षा अधिक उत्तम होईल आणि कामगारांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.
अशा संवादातून कामगारांचे प्रश्न सर्वांसमोर येतात आणि त्यावर चर्चा होऊन तोडगा निघतो. सरकारी यंत्रणा भविष्याच्या द़ृष्टीने योग्य ते नियम लागू करतात आणि कामगारांचे आरोग्य नक्कीच सुरक्षित होण्यास मदत होते.

कामाच्या ठिकाणी अनेक कामगार काम करत असतात; पण त्यांच्यामध्ये संवाद नसतो. कामगार -कामगार तसेच कामगार-वरिष्ठ असा मुक्त संवाद झाला, तर एकमेकांचे प्रश्न समजण्यास मदत होते आणि ते प्रश्न सरकार दरबारी पोहोचण्याससुद्धा मदत होते म्हणून कामाच्या ठिकाणच्या सर्व कामगारांनी एकमेकांबरोबर सुसंवाद ठेवणे हे तिथल्या सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या द़ृष्टीने उपयुक्त ठरते.

असा सुसंवाद जगातल्या अनेक देशांत अनेक कामगारांना त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोगात आला आहे. सर्वांनी याबाबत अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. आपण आपल्या कामगार बांधवांचा विचार केवळ आज एका दिवशी न करता सातत्याने केला, तर तो खर्‍या अर्थाने साजरा केला, असे होईल.

– डॉ. अनिल मडके

Back to top button