‘हेरिटेज ट्री’ची सोलापुरात खाणच | पुढारी

‘हेरिटेज ट्री’ची सोलापुरात खाणच

सोलापूर, जगन्नाथ हुक्केरी :  राज्याच्या नागरी भागात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री’ असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून, सर्वेक्षणात अनेक झाडे सापडल्याने सोलापुरात ‘हेरिटेज ट्री’ची खाण असल्याचे सिद्ध झाले आहे.

वृक्षांनासुद्धा प्राचीन, नैसर्गिक, धार्मिक, सांस्कृतिक, भौगोलिक महत्त्व असून; त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांचे जतन करताना त्यांना केवळ एक झाड म्हणून न पाहता, तो एक वारसा यादृष्टीने पाहण्याची गरज आहे. सोलापुरातही अशी शेकडो प्राचीन झाडे असून त्यांचे आयुर्मान 50 वर्षे व त्यापेक्षा जास्त आहे. अनेक संघटना आणि वृक्षप्रेमींनी यासाठी पुढाकार घेतल्यानंतर राज्य शासनाने याची घोषणा केली. त्यानंतर तत्काळ सोलापुरात याची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. यामुळे जुन्या आणि ऑक्सिजन देणारी झाडे जगण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अशा झाडांच्या पालकांनाही प्रोत्साहन मिळणार असल्याने त्यांच्यात उत्साह वाढणार असून ‘हेरिटेज ट्री’ पाहण्यासाठी गर्दीही होणार आहे.  यातून त्यांना उत्पन्नाबरोबरच प्रोत्साहन अनुदानही देण्याच्या मनस्थितीत शासन असल्याचे वृक्षप्रेमींचे मत आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करून ‘हेरिटेज ट्री’ ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रम राबविण्याचे नियोजन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. यामध्ये वृक्षाचे वय, भरपाई, वृक्षारोपण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना, स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची रचना, कर्तव्ये निश्चित करणे, वृक्ष गणना करणे, वृक्ष लागवडीसाठी सामूहिक जमीन निश्चित करणे, वृक्षांचे पुनर्रोपण, वृक्ष संरक्षणासाठी पर्यायी विकल्पांचा शोध, वृक्ष उपकर आणि दंडाच्या तरतुदी या ठळक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जूनमध्ये हा निर्णय घेतल्याने वृक्षप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.

आतापर्यंत शहरात आढळलेली झाडे

महानगरपालिका उद्यान विभागाच्या सर्व्हेक्षणात सोलापुरात वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, रेन ट्री, पिंपरण ही झाडे आढळून आली आहेत. त्यांची पाने, वलय, बांधा, बिया, मूळ, पारंब्या तपासून झाडांचे वय निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतरच झाडांची संख्या कळणार आहे.

जुनी झाडे असलेले परिसर…

महापालिका उद्यान विभागाच्या सर्व्हेक्षणात पुणे नाका परिसरातील महापालिका फिल्टर हाऊस परिसर, घंटागाडी डंपिंग परिसर, विजयपूर रस्त्यावरील प्राणिसंग्रहालय, पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असलेली किल्ला बाग, संभाजी तलाव परिसर, रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात जुनी झाडे सापडली आहेत. शहरातील खासगी, शासकीय जागांमधील झाडांचे आणखी सर्व्हेक्षण आणि गणना करण्याचे काम सुरूच आहे.

यावरून ओळखता येणार झाडांचे वय

झाडांचे वय ओळखण्याच्या वैज्ञानिक बाबी आहेत. झाडांचे वलय, बांधा, बिया, पाने, पारंब्या, गर्त, मूळ, फांद्यांसह इतर घटकांवरून झाडांचे वय कळणार आहे. आधी झाडांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर तांत्रिक बाबी तपासून ‘हेरिटेज ट्री’ घोषित करण्यात येणार आहे.

पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरी भागातील विशेष म्हणजे नागरी वसाहतीतील झाडांची कत्तल थांबविण्यासाठी ही योजना जाहीर केली आहे. ‘हेरिटेज ट्री’ची योजना सध्यातरी शहरी भागापुरतीच मर्यादित आहे. यामुळे झाडांचे जतन होईल.
– धैर्यशील पाटील
उपवनसंरक्षक

शोधमोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. वर्षभर याचे काम चालणार आहे. अनेक ठिकाणी जुनी झाडे सापडत आहेत. यामुळे झाडांविषयी प्रेम वाढण्यास मदत होणार आहे.
– शशिकांत कांबळे
उद्यान अधीक्षक, महानगरपालिका

Back to top button