धुळे : स्कार्पिओतून हत्यारांची वाहतूक ; चौघांकडून 89 तलवारी, 1 खंजीर जप्त | पुढारी

धुळे : स्कार्पिओतून हत्यारांची वाहतूक ; चौघांकडून 89 तलवारी, 1 खंजीर जप्त

धुळे पुढारी वृत्तसेवा : राजस्थान मधून जालना जिल्ह्याकडे चालविलेला हत्यारांचा साठा सोनगिरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने जप्त केला आहे. या कारवाईत एका स्कार्पियो मधून 89 तलवारीसह एक खंजीर पोलिसांनी जप्त केले असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना शिरपूरकडून एम.एच 09 सि. एम 00 15 या क्रमांकाची स्कार्पियो संशयितपणे येताना दिसले. या गाडीच्या सर्व काचा काळ्या रंगाच्या असल्यामुळे पोलिस पथकाने चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र स्कार्पिओ चालकाने गाडी वेगाने पळविण्यास सुरुवात केल्याने पोलिस पथकाने पाठलाग सुरू करून गाडी सोनगीर फाट्याजवळ पकडली. गाडीमध्ये असलेल्या व्यक्तींची चौकशी पोलीस पथकाने सुरू केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ही गाडी सोनगीर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. गाडीची तपासणी केली असता त्यात 89 तलवारी व एक खंजीर असा हत्याराचा साठा आढळून आला. गाडीतून जालना येथे राहणारे मोहम्मद शरीफ मोहम्मद रफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम तसेच कपिल विष्णू दाभाडे या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांची चौकशी केली असता हा हत्याराचा साठा त्यांनी राजस्थान मधून घेतला होता. त्याचप्रमाणे हत्याराची वाहतूक जालना जिल्ह्यात होणार असल्याचे देखील प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. यासंदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असून त्यांनी अशाच प्रकारचा गुन्हे केले असल्याचा संशय पोलीस पथकाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

Back to top button