

धुळ पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा ; साक्री तालुक्यातील शिवाजी नगर शिवारातील गट. क्र १२८ मधील शेतजमिनीवर महाजन को.लि.कंपनी तर्फे गोदरेज कंपनी करीत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम त्वरित थांबवावे. या बांधकामाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यामागणीसाठी साक्री तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तहसील कार्यालयासमोर दि. 25 पासून उपोषण सुरु आहे.
शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीचा कुठलाही मोबदला न देता हुकूमशाही पद्धतीने शेतकरी बांधवांच्या जमिनीवर अतिक्रमण करून काम चालू केले आहे. संबंधित शेतकरी बांधव विरोध करायला गेले असता शेतकऱ्यांना शासकीय अधिकाराचा वापर करून त्यांच्यावर दमदाटी करून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू अशा धमक्या संबंधित कंपनीचे अधिकारी देत असल्याची तक्रार उपोषकर्त्यांची आहे.
या उपोषणात गोपिचंद धर्मा भिल, धाकु शिवा भिल, लिलाबाई फुलसिंग भिल, दामु फुल्या भिल, शामल्या केवजी भिल, नानाभाऊ रावजी भिल, मगन महाळु चांभार, जगन सावळु शिंदे, सावळु नथ्थु वडार, मुस्ताक शेख रसुल, सायजादवी मुसा खाटीक, सुका बुधा पारधी, पावबा काळु भिल, बुधा लालसिंग भिल, भुरीबाई भगवान भिल, नानाभाऊ रावळ्या भिल, सैयद फुतु सै सैड, कोचरु राण्या नामदास यांनी मुलाबाळांसह उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आदिवासी २१ शेतकरी बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख कैलास भदाणे व पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी दिला आहे.