नाशिक : एक लाख वीजमीटर आठवडाभरात उपलब्ध; 15 लाख नवीन मीटरच्या पुरवठ्याचा आदेश | पुढारी

नाशिक : एक लाख वीजमीटर आठवडाभरात उपलब्ध; 15 लाख नवीन मीटरच्या पुरवठ्याचा आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना एप्रिल अखेरीपर्यंत 1 लाख 31 हजार 802 वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत 15 लाख मीटरचा पुरवठा करण्याचे आदेश महावितरणने पुरवठादारांना दिले आहेत.

महावितरणकडून दरवर्षी सुमारे 8 ते 9 लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. त्यासोबत नादुरुस्त व इतर कारणांमुळे मीटर बदलण्यासाठी दरमहा 2 लाख मीटरची आवश्यकता असते. त्यानुसार महिना अखेरपर्यंत सव्वा लाखाहून अधिक मीटर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मे महिन्यात दोन लाख, तर जून ते सप्टेंबरपर्यंत दर महिन्यात 3 लाख 27 हजार 500 मीटर महावितरण उपलब्ध करून देणार आहे. या व्यतिरिक्त 10 लाख स्मार्ट मीटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबत दीड लाख थ्री फेज मीटर घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्याचा पुरवठा मे अखेरीस होईल, अशी माहिती महावितरणने दिली आहे. ग्राहकांची वाढती मागणी बघता, आणखी 20 लाख सिंगल फेज मीटर घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कृषी ग्राहकांना प्रीपेड मीटर : वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणालीअंतर्गत जोडणी दिलेल्या कृषी ग्राहकांना प्रीपेड मीटर बसविण्याचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या कृषी ग्राहकांना 1.50 लाख प्रीपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button