नाशिक : ‘सिटीलिंक’च्या कक्षा रुंदावणार ; उद्यापासून ‘या’ नवीन मार्गांवर मनपाची बससेवा | पुढारी

नाशिक : ‘सिटीलिंक’च्या कक्षा रुंदावणार ; उद्यापासून 'या' नवीन मार्गांवर मनपाची बससेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या कक्षा अधिक रुंदावणार आहेत. सोमवार (दि. 25) पासून तीन नवीन मार्गांवर सिटीलिंकच्या बसेस धावणार आहेत. त्यामध्ये नाशिकरोड रेल्वेस्थानक ते चुंचाळे गाव, नाशिकरोड रेल्वेस्थानक ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि नाशिकरोड रेल्वेस्थानक ते गंगावर्‍हे या मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे नवीन मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सद्यस्थितीत 47 मार्गांवर सिटीलिंकच्या सुमारे 202 बसेस धावत आहेत. मात्र, प्रवाशांची होणारी मागणी लक्षात घेता, सिटीलिंक टप्प्याटप्प्याने नवीन मार्गांवर सुरू करण्यात येत आहेत. त्यात आता नव्या तीन मार्गांची भर पडणार आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानक ते चुंचाळे गाव ही बस द्वारका, शालिमार, नवीन सीबीएस, कामटवाडा अशी रवाना होणार आहे. या मार्गावरील पहिली बस सकाळी 6.10 वाजता, तर शेवटची बस 18.35 वाजता सुटणार आहे. नाशिकरोड ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या बसचा मार्ग द्वारका, सीबीएस, आनंदवली असा असणार आहे.

नाशिकरोड ते मुक्त विद्यापीठ पहिली बस सकाळी 8.40 वाजता सुटेल, तर शेवटची बस 16.30 वाजता सुटेल. मुक्त विद्यापीठातून 18 वाजता नाशिकरोडसाठी बस उपलब्ध राहणार आहे. नाशिकरोड ते गंगावर्‍हे ही बस द्वारका, सीबीएस, आनंदवली अशी रवाना होणार आहे. नाशिकरोड ते गंगावर्‍हे पहिली बस सकाळी 7.10 वाजता, तर शेवटची बस 22.00 वाजता निघेल. पंचवटी रेल्वेसाठी गंगावर्‍हे ते नाशिकरोड रेल्वेस्थानक 5.45 वाजता व नाशिकरोड ते गंगावर्‍हे 22 वाजता फेर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची गैरसोय टळणार…
सोमवार (दि. 25) पासून नवीन तीन मार्गांवर सिटीलिंकची बससेवा मिळणार आहे. या नव्या बससेवेमुळे विद्यार्थी, नोकरदार, कामगार यांची गैरसोय टळणार आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button