पणजी : काळाच्या ओघात टपालपेटी कालबाह्य

टपालपेटी
टपालपेटी
Published on
Updated on

पणजी :  विठ्ठल गावडे पारवाडकर
पत्र हे काही वर्षांपूर्वी प्रत्येक व्यक्‍तीच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र, अत्याधुनिक सुधारणांच्या या काळात सध्या टपाल आणि टपाल पेट्या कालबाह्य ठरत आहेत. सध्याचा जमाना स्मार्टफोनवरून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून थेट बोलण्याचा असल्याने टपालाचे महत्त्व जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, काही वर्षापूर्वी हेच टपाल प्रत्येक व्यक्‍तीच्या जीवनाची सलग्न होते. टपाल या नावावरूनच चित्रपट तयार झाले. कविता तयार झाल्या आणि अनेकांना रोजगार देणारे ते माध्यमही ठरले होते. मात्र आता ती स्थिती नाही.

पूर्वीच्या काळी एखाद्या गावांमध्ये एखादी घटना घडली मग ती घटना दुसर्‍या गावातील मित्रांना किंवा सग्या- सोयर्‍यांना कळायला आठवड्याचा बाजार यावा लागत असे. बाजारात चार गावातील लोक जमा व्हायचे व अमूकाच्या घरात अमूक गोष्ट घडली, असे सांगायचे मग ती घटना सर्वदूर पोचत होती. न पेक्षा लोक सदर घटनेपासून आठ आठ दिवस अनभिज्ञ असायचे. आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी किंवा वार्षिक जत्रौत्सवाच्यावेळी दूर दूरचे लोक एकत्र जमा झाले, की काही महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेवर चर्चा होऊन ती सर्वदूर पोहोचायची. मोठी सुखाची किंवा दुःखाची घटना असेल तरच प्रत्यक्ष व्यक्ती पाठवून ती कळवली जायची.

कालांतराने पत्रव्यवहार सुरू झाला आणि पत्राद्वारे चांगल्या-वाईट घटना आपापल्या आप्तांना, मित्रांना किंवा गरज असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या जाऊ लागल्या. त्यामुळे पत्र हे सर्वांच्या जीवाभावाचे माध्यम ठरले होते. पत्राची वाट आतुरतेने पाहणारे हजारो लोक होते. सैन्यामध्ये नोकरीला असलेले सैनिक आपल्या घरी दर महिन्याला पत्र पाठवत होते आणि त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती दर महिन्याच्या त्या तारखेला पत्राची आतुरतेने वाट पाहात होते.

पत्र तथा टपाल आणि त्याचा व्यवहार करणारे टपाल खाते लोकांच्या जीवनाशी सलग्न होते. मात्र, आता पत्र टाकण्यात ज्या पेट्या होत्या त्याही आता कालबाह्य ठरल्या आहेत. कारण पत्रव्यवहार नाही तर पेट्यांत पत्र टाकणार कोण. आपल्या जवळच्या टपाल पेटीमध्ये पत्र टाकल्यानंतर ते पत्र चांगल्याप्रकारे आत गेले की नाही याची खातरजमा करणारे अनेक लोक त्याकाळी होते. मात्र काळ बदलला. नवे तंत्रज्ञान आले. पत्रानंतर संदेश पाठवण्याचे माध्यम हे दूरध्वनी होते. नंतर मोबाईल आले आणि घराघरातील दूरध्वनी कोपर्‍यात पडले. स्मार्ट फोन आल्यानंतर तर क्रांतीच घडली. जगाच्या कोपर्‍यातील घटना एका क्षणात कळू लागल्या. प्रत्यक्ष व्हिडीओ कॉलवरून आपल्या मित्र व सबंधितांशी बोलण्याची सोय झाली आणि पत्र गेले. कागदावरील लिखित संदेश जाऊन मोबाईल संदेश देण्याची सोय झाली. पूर्वी पोस्टमन आणि पत्र जसे सर्वांच्या जवळचे होते, तसा आता मोबाईल झाला आहे. मात्र, ज्यांनी त्याकाळी वारंवार पत्रे लिहिली व टपाल पेटीत टाकली त्यांच्या त्याकाळच्या आठवणी जेव्हा रस्त्याकडेला टपाल पेटी दिसते, त्यावेळी जागृत होतात. मात्र आता पत्रे कालबाह्य झाली तशाच टपाल पेट्याही कालबाह्य होत आहेत. निर्मिती होणारी वस्तू एक दिवस कालबाह्य होतेच मग त्याला पत्र आणि टपालपेट्या कशा अपवाद असतील नाही का.

पोस्टमला होता सन्मान

त्याकाळी पत्र घरोघरी पोहोचवणार्‍या पोस्टमनला मोठा सन्मान होता. घरी पत्र घेऊन आल्यानंतर त्याला चहा पाणी देण्यात येत होते. ज्यांना वाचता येत नाही त्यांची पत्रे पोस्टमन वाचून दाखवत होता. त्यामुळे लोकांची वैयक्तिक माहिती, गुपिते पोस्टमनला समजत होती. पैसे पाठवण्यासाठी त्याकाळी मनिऑर्डर हे माध्यम होते. पैसे घेऊन येणार्‍या पोस्टमनला चहासाठी काही रक्कम देण्याची पद्धत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news