नाशिक महापालिका जुन्या इमारतींचे करणार स्ट्रक्चरल ऑडिट ; आयुक्तांचे आदेश | पुढारी

नाशिक महापालिका जुन्या इमारतींचे करणार स्ट्रक्चरल ऑडिट ; आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील 30 वर्षांहून अधिक जुन्या इमारती, वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला असून, त्या अनुषंगाने जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा आयुक्त रमेश पवार यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

नाशिक शहरातील जुने नाशिक (गावठाण परिसर), पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, देवळाली गाव या गावठाणांमध्ये आजही हजारो कुटुंबे जुन्याच घरांमध्ये तसेच इमारती आणि वाड्यांमध्ये राहत आहेत. या इमारती व वाडे धोकादायक झाल्या असूनही अनेक कुटुंबे अजूनही त्याच ठिकाणी वास्तव्य करत असल्याने या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. पावसाळ्यापूर्वी मनपा प्रशासनाकडून संबंधित धोकादायक घरे आणि वाड्यांना नोटिसा बजावून स्थलांतरित होण्याची सूचना केली जाते. दरवर्षी पावसाळ्यात एखादी जुनी इमारत, वाडे कोसळण्याची घटना घडून त्यात जीवित व वित्तहानी होत असते. शहरात आजमितीस जवळपास दीड हजाराच्या आसपास जुन्या इमारती तसेच वाडे आहेत.

या मालमत्ताधारकांना मनपाकडून नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेने 30 वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारती, वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक केले असून, महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 265 (अ)नुसार महापालिका हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी इमारतींचे घरमालक किंवा भोगवटादारांना त्यांच्या मालकीच्या मिळकतीचे सर्वेक्षण करून इमारतीचे स्ट्रक्चर सुस्थितीत आहे की नाही, याचा अहवाल महापालिकेला सादर करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार संबंधित इमारतींचे सर्वेक्षण करून मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदाही धोकादायक, जीर्ण झालेल्या इमारती, घरांना विभागीय अधिकार्‍यांमार्फत नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button