नाशिक : स्वत:सह इतरांना रोजगार उपलब्ध करून द्या : दीपेंद्रसिंह कुशवाह | पुढारी

नाशिक : स्वत:सह इतरांना रोजगार उपलब्ध करून द्या : दीपेंद्रसिंह कुशवाह

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा : देशात 50 हजार स्टार्ट अप आहेत. त्यापैकी 20 टक्के महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे अधिकाधिक नाशिककरांनीही यात सहभाग नोंदवून आपली वेगळी ओळख निर्माण करावी. स्वत:सह इतर लोकांना रोजगार निर्माण करून देण्यात योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले. आयटी सिग्नल येथील नाइस संकुलमध्ये सिटिझन फोरमतर्फे आयोजित ‘आउटस्टॅण्डिंग अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी नाशिक सिटिझन फोरमचे अध्यक्ष हेमंत राठी, माजी अध्यक्ष सुनील भायभंग, सचिव अविनाश पाटील, खजिनदार आर्किटेक्ट सचिन गुळवे आदी उपस्थित होते. कुशवाह म्हणाले की, नाशिक कुंभमेळ्यानिमित्त मला माझ्या आयुष्यातील सर्वांत उत्तम काम करण्याची संधी मिळाली. अगदी 14 महिन्यांच्या कालावधीत मी नाशिकमध्ये काम केले, पण प्रत्येक दिवस वेगळा होता. कुंभमेळ्याच्या तयारीत असताना एका पत्रकाराने कुंभमेळा होतोय पण नदी कुठे आहे, असा प्रश्न विचारला, तेव्हा दोन दिवसांत नदी स्वच्छतेसाठी शासकीय कर्मचार्‍यांना बोलावले. या कार्यासाठी नाशिककरांना आवाहन केले अन् बघता बघता या मोहिमेत 22 हजार नाशिककर सहभागी झाले होते. नाशिककरांची शहराच्या विकासाची, स्वच्छतेची कळकळ मला आश्चर्यचकित करणारी होती, हे सांगतानाच याच काळात पाच लाख वृक्षांचे रोपण नाशिककरांनी केल्याचे व त्यासाठी अनेक संस्था पुढे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. पुरस्कारार्थींनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. अविनाश पाटील यांनी सूत्रसंचालन, तर हेमंत राठी यांनी प्रास्ताविक केले. माजी अध्यक्ष विक्रम सारडा, जितेंद्र ठक्कर, डॉ. नारायण विंचूरकर, निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, आयमाचे माजी अध्यक्ष संदीप सोनार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कारार्थी असे…
शहराच्या विकासासाठी तसेच लौकिक वाढविण्यासाठी झटणार्‍यांचा विविध क्षेत्रांत काम करणार्‍यांचा नाशिक सिटिझन फोरमकडून आउटस्टॅण्डिंग सिटिझन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पहिल्या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या व प्राण्यांसाठी काम करणार्‍या शरण संस्थेच्या संस्थापिका शरण्या शेट्टी, नंदिनी नदी स्वच्छतेसाठी झटणारे व्हिसलमॅन चंद्रकिशोर पाटील, विमानसेवेसाठी झटणारे
उद्योजक मनीष रावल यांचा यावेळी कुशवाह यांच्या हस्ते सन्मान केला गेला.

हेही वाचा:

Back to top button