नाशिक : अंगणवाडी सेविकांचा 22 एप्रिलला थाळीनाद मोर्चा | पुढारी

नाशिक : अंगणवाडी सेविकांचा 22 एप्रिलला थाळीनाद मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविकांना मराठी भाषेतून पोषण ट्रॅकर अ‍ॅप उपलब्ध करून द्यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका शुक्रवारी,दि. 22 एप्रिलला दुपारी 12 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद मोर्चा काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या योजनांच्या अंमलबजावणीची माहिती सरकारला दैनंदिन उपलब्ध व्हावी यासाठी पोषण ट्रॅकर हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यात अंगणवाडी सेविका त्यांनी दैनंदिन केलेल्या कामाची माहिती अपलोड करीत असतात. मात्र, हे अ‍ॅप इंग्रजीतून असल्यामुळे त्यांना या अ‍ॅपमध्ये माहिती भरणे जमत नाही. त्यांना इतरांची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे हे अ‍ॅप मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करूनही सरकारकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे हे आंदोलन केले जाणार आहे. याशिवाय अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन वाढवणे, अमृत आहार योजनेची अंमलबजावणी बेकायदेशीर कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे, ती बंद करणे, अमृत आहार योजनेच थकीत मानधन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचार्‍यांना निवडणुकीची कामे देण्यात येऊ नयेत आदी मागण्याही आहेत.

हेही वाचा:

Back to top button