नाशिक : त्र्यंबकला घरकुल लाभार्थी आक्रमक ; गटविकास अधिकारी नसल्याने कामांचा खोळंबा | पुढारी

नाशिक : त्र्यंबकला घरकुल लाभार्थी आक्रमक ; गटविकास अधिकारी नसल्याने कामांचा खोळंबा

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा: घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने सोमवारी (दि.11) त्र्यंबकेश्वर पंचायत समिती प्रांगणात शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी माकपचे इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले.

माकपचे जिल्हा सचिव इरफान शेख यांनी यावेळी लाभार्थींचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर ताबडतोब टाकण्यात यावे, अशी मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी व त्र्यंबकेश्वर तहसीलदार यांना याबाबत माहिती देत गत सहा महिन्यांपासून त्र्यंबकला गटविकास अधिकारी नसल्याचे निदर्शनास आणून देत येथे सुरू असलेल्या बेजबाबदार कारभाराची माहिती दिली. तालुक्यातील 1,584 घरकुल लाभार्थी वेळेवर हप्ते मिळत नसल्याने त्यांची कामे रखडली आहेत.

अवघे दोन महिनेदेखील हाताशी राहिलेले नसताना पंचायत समितीच्या वेळकाढूपणा चालल्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. आधारकार्डवर असलेली नावातील चूक इंग्रजी स्पेलिंगमध्ये बँक खाते आणि आधारकार्ड यामध्ये असलेला एखाद दुसर्‍या अक्षराचा बदलदेखील घरकुलाचा लाभ मिळण्यास अडथळा ठरत आहे. यासाठी ग्रामसेवकांनी गावपातळीवर लाभार्थींना मदत करण्याची गरज असताना तसे घडत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी विविध प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान सहायक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी आठ दिवसांत सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आठ दिवसांत लाभार्थींना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले नाही, तर पंचायत समिती आवारात चूल मांडून सर्व लाभार्थी मुक्काम ठोकतील. घरकुलाचे थकलेले हप्ते मिळत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाहीत. – इरफान शेख, जिल्हा सचिव, माकप

हेही वाचा:

Back to top button