नाशिककरांनी लुटला मड बाथचा आनंद | पुढारी

नाशिककरांनी लुटला मड बाथचा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चामरलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदिनी डेअरी फार्म येथे सालाबादप्रमाणे आणि दोन वर्षांच्या खंडानंतर आयोजित मड बाथचा (माती स्नानाचा) आबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी आनंद लुटला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून त्यांना ओळखणेही कठीण जात होते, असा नजारा होता.

महेश शहा, चिराग शहा तसेच भाजप नेते नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 25 वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. कोरोनामुळे दोन वर्षे या उत्सवात खंड पडला होता. मात्र, यावर्षी लोकांचा उत्साह दांडगा दिसला. मुंबई, पुणे तसेच राज्याच्या काही भागांतील आणि नाशिक महानगरातील सुमारे एक हजार लोकांनी मड बाथचा आनंद लुटला. खरे तर हनुमान जयंतीनंतर येणार्‍या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. मात्र, यावेळी त्यात बदल करण्यात आला आणि हनुमान जयंतीच्या आधीच्या रविवारी म्हणजे श्रीरामनवमीला त्याचे आयोजन करण्यात आले.

सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू झाला. बघता बघता लोकांचे जत्थेच्या जत्थे येथे येऊ लागले आणि स्वतःच्या अंगाला चिखल फासू लागले. पूर्वी एका पाटीत चिखल घेऊन प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या तो फासावा लागत होता. मात्र, यावेळी 25 फूट लांबीचा खास टब तयार करण्यात आला होता आणि त्यात चिखल होता. या टबमध्ये 25 ते 30 लोक एकाच वेळी उतरून व अंगाला चिखल लावून बाहेर येत होते. नंतर एक तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली उभे राहून मड बाथचा आनंद लुटत होते.

महिनाभरापासून तयारी
महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली होती. वारुळाची माती गोळा केली गेली. आठ दिवस आधी ही माती भिजवली गेली. संपूर्ण शरीराला ही लावून आंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे याने शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते, असेही यावेळी सांगण्यात आले.

यांनी घेतला उपक्रमात सहभाग
उद्योजक अशोक कटारिया, विशाल उगले, अभय शाह, बाळासाहेब काठे, भगवान काळे, डॉ. ज्ञानेश्वर चोपडे, डॉ. नितीन रौंदळ, वैभव शेटे, ज्ञानेश्वर गायकवाड, अमित घुगे, मिलिंद वाघ, विजय पाटील, मनोज देसाई, गौरव देसाई, जयेश देसाई आदींसह नाशिक सायकलिस्ट, जॉगर्स ग्रुप, जल्लोष ग्रुप, पंचवटी व्यापारी ग्रुप, नाशिक इको ड्राइव्ह, चामरलेणी इको ड्राइव्ह आदी ग्रुपचे सदस्यांचा समावेश होता. मड बाथनंतर मिसळ पार्टीचाही सर्वांनी आनंद घेतला.

हेही वाचा :

Back to top button