भाजपच्या नकली भगव्याचा बुरखा फाडा : मुख्यमंत्री | पुढारी

भाजपच्या नकली भगव्याचा बुरखा फाडा : मुख्यमंत्री

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

प्रत्येक वेळी सोयीने रंग बदलणार्‍या भाजपचे हिंदुत्व फसवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवाच खरा भगवा आहे. भाजपच्या नकली भगव्याचा बुरखा फाडा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. भाजपबरोबर आमची छुपी युती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना जे असेल ते उघड करते, एकदा होय म्हटले की जीव गेला तरी बेहत्तर; पण मागे हटणार नाही, असा कट्टर शिवसैनिक काँग्रेसलाच मतदान करणार, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. हा नवा प्रयोग आहे. तो यशस्वी करा, कोल्हापूरचा भगवा पुसू देऊ नका, गाफील राहू नका, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खा. विनायक राऊत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. संजय मंडलिक, प्रा. आ. जयंत आसगावकर, काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव याप्रसंगी उपस्थित होते.

ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसबरोबर जाण्याची परिस्थिती तुम्हीच निर्माण केली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला व आता काँग्रेसला मतदान केले तर पाप म्हणता. काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीसोबत जाऊन बसलात ते काय पुण्य होते काय, असा खडा सवाल ठाकरे यांनी भाजपला केला.

तुम्हीच नीचपणा केलाय!

विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, फडणवीस म्हणतात, पूर्वी आम्ही कोल्हापुरात आलो की ताराराणी चौकात बाळासाहेब ठाकरे यांचा भगवे वस्त्र परिधान केलेला फोटो आम्हाला दिसायचा. आता त्यांच्या जागी सोनिया गांधींचा फोटो दिसतो. होय. ती परिस्थिती आहेच आणि ती तुम्हीच आणली आहे. बाळासाहेबांविषयी इतके प्रेम आहे तर तुम्हीच नीचपणा करीत त्यांच्या नावापुढे जनाब ही पदवी कशी लावली, असा सवाल त्यांनी केला.

हल्ली सरपंचपदाच्या निवडणुकीपासून ते थेट पंतप्रधानपदाच्या निवडणुकीपर्यंत भाजपचा एकच फोटो दिसतो. समजत नाही ते सरपंच आहेत की पंतप्रधान, अशा शब्दांत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. शिवसेनेचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत शिवसेनेने ना झेंडा बदलला, ना भूमिका बदलली, असे सांगत ठाकरे म्हणाले, शिवसेना जे करते ते उघड करते. लपून-छपून तुमच्यासारखे काही करत नाही. जो वार करायचा आहे तो समोरून आणि सांगून आम्ही करतो. कर्नाटकात मराठी माणसाला बदडून काढले जाते तेव्हा भाजपचा एक तरी कार्यकर्ता रस्त्यावर येतो का? बेळगावात मराठी माणसांचा भगवा खाली खेचून काढला आणि नकली भगवा भाजपनेच चढवला ना, असा सवालही त्यांनी केला.

विक्रांतच्या पैशाने तुम्ही रेशन भरले

महाविकास आघाडी ही काही लेचीपेची नाही. आम्ही सर्वजण या मराठी मातीचीच मुले आहोत. कोरोना काळात जनतेला मोफत रेशन दिले म्हणता, ते तुमच्या पैशाचे आहे का? आणि जे दिले ते शिजवायचे की कच्चे खायचे? त्यासाठी गॅस कुठे आहे? त्याचे दर किती वाढवले? आमच्या पैशाने रेशन दिले आणि विक्रांतच्या पैशाने तुमचे रेशन भरले. आमच्या हक्काचे जीएसटीचेही पैसे तुम्ही देत नाही! महाराष्ट्राची भ—ष्टाचारी, मद्यराष्ट्र म्हणून बदनामी करता, मग सर्वाधिक वाईन शॉप असणारे मध्य प्रदेश, कर्नाटक, सर्वाधिक दारूतून उत्पन्न मिळवणारे उत्तर प्रदेश ही कोणती राज्ये आहेत, असा सवाल ठाकरे यांनी केला.

औरंगजेब दिल्लीतून महाराष्ट्रात आला, 26 वर्षे लढला. पण कोल्हापूरच्या ताराराणीने त्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. त्याला याच मातीत गाडला. त्याच ताराराणीचा वारसा सांगणार्‍या जयश्री जाधव यांना कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला आमदार म्हणून विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्य थांबू दिले नाही

कोरोनापाठोपाठ अनेक आपत्ती आल्या. त्याचे ओझे खांद्यावर घेऊन चाललोय. पण राज्य थांबू दिले नाही, असे सांगत ठाकरे म्हणाले, कोल्हापूरचा विकास सुरू आहे. तो आणखी कसा करता येईल, याचा प्रयत्न आहे. कोल्हापूरसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. अंबाबाई मंदिर विकासाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 25 कोटी रुपये निधी दिला. कोरोना आपत्ती, राजर्षी शाहू समाधी स्थळ, विमानतळ याच्यासाठी आर्थिक मदत दिली.

जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व करवीर तहसील इमारत, राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार करत आहोत. खंडपीठाबद्दल मुख्य न्यायाधीशांसमवेत संवाद सुरू आहे. कोणतीच गोष्ट अर्धवट सोडली नाही. हवेतील गोष्टी प्रत्यक्षात करण्यास सुरुवात केली आहे. यापुढेही कोल्हापूरच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे त्यांनी सांगितले.

विक्रांतसाठी पैसे खाणार्‍या दलालाची बाजू घेणे शरमेची गोष्ट

महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी आहे. मुंबई महापालिकेत कोव्हिड काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप करीत आहे. परंतु आपत्ती व्यवस्थापन कायदा होता. मुंबईत कोरोना काळात एकही काम टेंडर न काढता महापालिकेने केलेले नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुमच्या एका दलालाने विक्रांत नावाखाली पैसे खाल्ले. त्यांची तुम्ही बाजू घेता, याच्याएवढी शरमेची गोष्ट दुसरी नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाव न घेता किरीट सोमय्यांवर लगावला. यावेळी माजी आ. मालोजीराजे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण उपस्थित होते.

पंचगंगा नदीतील पाण्यासारखी मते दूषित झाली का?

2014 ला कोल्हापुरात भगवा फडकवला. शिवसेनेला त्यावेळेस 69 हजार 770, भाजपला 40 हजार 104 मते मिळाली. काँग्रेसला 47 हजार 315 मते मिळाली. 2019 ला भाजपबरोबर युती झाली. त्यावेळी भाजपच्या 40 हजारांपैकी काही मते मिळायला हवी होती. परंतु 75 हजार 854 मते मिळाली. त्यावेळी भाजप युतीत होता. मग ही मते वळवली कुठे, असा सवाल करीत ही मते पंचगंगा नदीच्या पाण्यासारखी दूषित झाली का? 2019च्या शिवसेनेचा निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी काँग्रेसला छुपे मत दिले होते की नाही, याचा खुलासा भाजपने करावा, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Back to top button