सांगली : सांगली अर्बन, शिक्षक बँक, सॅलरीची लवकरच निवडणूक

सांगली : सांगली अर्बन, शिक्षक बँक, सॅलरीची लवकरच निवडणूक
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली अर्बन बँक, प्राथमिक शिक्षक बँक व दि सॅलरी अर्नर्स सोसायटीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणच्यावतीने त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. या संस्थांकडून चार दिवसात मतदारयादी मागवण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकार्‍याकडे यादी गेल्यानंतर कच्ची मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर 10 दिवस हरकतीसाठी, हरकतीवर सुनावणीसाठी 10 दिवस, तर पक्की मतदार यादी प्रसिद्धीसाठी 5 दिवस दिले जाणार आहेत. 25 दिवसाचा हा कार्यक्रम झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करून प्रत्यक्ष अर्ज विक्रीपासून 42 ते 45 दिवसाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. म्हणजेच साधारणत: जुलैच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यामध्ये निवडणूक होणार आहे.

सांगली अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची मुदत मे 2021 मध्ये संपली आहे. या बँकेत 17 संचालक आहेत. तर मतदानास सुमारे 61 हजार सभासद पात्र आहेत. गतवेळच्या निवडणुकीत गणेश गाडगीळ यांच्या पॅनलने बापूसाहेब पुजारी पॅनलचा पराभव करीत सर्वच्या सर्व 17 संचालक निवडून आले होते. दरम्यानच्या काळात यापैकी काही संचालकांनी काही मुद्यांवर सत्ताधार्‍यांना विरोध केला आहे. काहींनी थेट सहकार खात्याकडे सत्ताधारी गटाच्या काही निर्णयाविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. यापैकी काही संचालकांनी सहकार विभागाकडे राजीनामे दिले असून येत्या निवडणुकीत विरोधी गटाचे बापूसाहेब पुजारी यांच्या पॅनलकडून ते निवडणूक लढवणार असल्याचे समजते.

शिक्षक बँक संचालक मंडळाची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपलेली आहे. 7500 सभासद निवडणुकीस पात्र असून गतवेळच्या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक समितीचे 14 तर, विरोधी संभाजी थोरात प्रणित शिक्षक संघाचे 7 संचालक निवडून आले होते. बँकेमध्ये शिक्षक समितीच्या विरोधात संभाजी थोरातप्रणित शिक्षक संघाकडून एकास एक लढत देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शि. द. पाटील प्रणित शिक्षक संघ व अन्य सर्व गटांना एकत्रित करून ते निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. सॅलरी अर्नर्स सोसायटी संचालक मंडळाची मुदत जून 2020 मध्ये संपली आहे. 19 जागेसाठी सुमारे 5200 सभासद निवडणुकीसाठी पात्र आहेत. गतवेळच्या निवडणुकीत डी. जी. मुलाणी, जे. के. महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व 19 संचालक निवडून आले होते. दरम्यानच्या काळात लालासाहेब मोरे यांनी बंडखोरी करीत सुमारे 10 संचालकांचा स्वतंत्र गट निर्माण केला व प्रस्थापितांना विरोध केला असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. येत्या निवडणुकीमध्ये या 10 संचालकासह बजरंग कदम, नंदू ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली बचाव समिती व गणेश मडावी यांच्या नेतृत्वाखाली कास्ट्राईब संघटना यांना एकत्र करून एकास एक लढत देण्यासाठीची त्यांनी तयारी केली आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news