जळगाव : मूल होत नसल्याने विवाहितेला क्रूर वागणूक; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या | पुढारी

जळगाव : मूल होत नसल्याने विवाहितेला क्रूर वागणूक; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील 27 वर्षीय विवाहितेला मूल होत नसल्याच्या कारणावरून छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती, चुलत सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

बोदवड (जि. जळगाव) येथील गोरक्षनाथनगरमधील भावना नीलेश महाजन (वय २७) हिने सोमवारी (दि. २१) राहत्या घरी सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. भावना व नीलेश  महाजन यांच्या लग्नाला सात वर्षे झाली होती. परंतु त्यांना मूलबाळ होत नव्हते. या कारणावरून पती व चुलत सासरे व सासू यांनी मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याने आत्महत्येला प्रवृत्त केले. भूषण अशोक माळी (रा. असोदा) यांच्या फिर्यादीवरून नीलेश सुभाष महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन (सर्व रा. गोरक्षनाथनगर, बोदवड) यांच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली असून चुलत सासू मंगला महाजन यांना मंगळवारी अटक करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद माळी तपास करीत आहेत.

Back to top button