चंद्रपूर : धान व्यावसायिकाची गोदामात हत्या, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा | पुढारी

चंद्रपूर : धान व्यावसायिकाची गोदामात हत्या, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा येथे एका व्यक्तीचा धानाच्या गोदामात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. त्याचा कानाजवळ धारदार शस्त्राने वार केल्याची जखम आढळून आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. विष्णू लालाजी दिवटे (५०, रा. बेटाळा) असे मृतकाचे नाव आहे. सदर व्यक्तीची हत्या करून मृतदेह गोदामात फेकण्यात आल्याचे प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे.

बेटाळा येथील विष्णू दिवटे यांचा धानाचा व्यवसाय असून, घरालगत गोदाम आहे. काल (२१ मार्च) ला सोमवारी दूपारी १२ वाजताच्या सुमारास विष्णू दिवटे यांचा गोदामाच्या ठिकाणी मृतदेह आढळून आला. त्यांच्या कानाजवळ धारदार शस्त्राने वार केल्याची जखम आढळून आली.

बेटाळा येथे रविवारी रात्री नाटक होते. त्यावेळी विष्णू प्रेक्षकात बसले होते. मध्यरात्रीनंतर ते गोदाम परिसरात झोपले. त्यानंतर सोमवारी त्यांचा मृतदेह आढळून आला.

या बाबतची तक्रार मृतकाच्या मुलाने ब्रम्हपुरी पोलिसात दाखल केली. मृतकाच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमावरून त्याची हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, प्रभारी उपविभागीय अधिकारी इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कुंभरे करीत आहे.

Back to top button