युक्रेनहून परतलेल्या नाशिकच्या श्रद्धाने सांगितली आपबिती, सर्वांचेच पाणावले डोळे | पुढारी

युक्रेनहून परतलेल्या नाशिकच्या श्रद्धाने सांगितली आपबिती, सर्वांचेच पाणावले डोळे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ; ज्या दिवशी मायदेशी परतायचे, त्याच दिवशी झालेला बॉम्ब वर्षाव अन‌् गोळीबारीने मायदेशी परतण्याच्या आशा मावळल्या होत्या. मात्र, कुटुंबीयांनी ही माहिती सुधाकर बडगुजर यांना दिल्याने, त्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला. त्यामुळे राज्य व केंद्राची मदत पोहोचून आम्ही तब्बल ७०० किमीचा खडतर प्रवास करून रोमानिया सीमा गाठली. दरम्यानच्या काळात अन्न-पाण्याविना जीव कासावीस झाल्याने रोमानियात आल्यानंतर मात्र दिलासा मिळाल्याची आपबिती युक्रेनहून नाशिकमध्ये दाखल झालेल्या श्रद्धा ढोनी हिने सांगितली. श्रद्धाच्या आपबितीने उपस्थितांचेही डोळे पाणावले.

मूळची जळगाव जिल्ह्यातील असलेली श्रद्धा नाशिकामध्ये तिच्या मामाकडे परतली. त्यानंतर आभार मानण्यासाठी ती शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयात आली असता, तिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्रद्धाने युक्रेन ते नाशिकपर्यंतचा तिचा प्रवास कथन केला असता, उपस्थितांचाही थरकाप उडाला. श्रद्धाने सांगितले की, 25 फेब्रुवारीला मायदेशी परतण्याचे तिकीट कन्फर्म होते. मात्र, त्याच दिवशी युद्धाला तोंड फुटल्याने मायदेशी परतण्याचे प्रयत्न अशक्य झाले. बंकर्समध्ये तीन दिवस खूप नरकयातना भोगल्या. मामा दत्तात्रय शेळके, हरीश शेळके तसेच आई-वडिलांशी संपर्क साधल्याने, त्यांनी बडगुजर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही वरिष्ठ पातळीवर माहिती दिल्याने राज्य व केंद्राने दखल घेत, युक्रेनमधील दूतावासाने आम्हाला बसने रोमानियाच्या सीमेपर्यंत सोडले. 700 किमीचा हा प्रवास अत्यंत खडतर होता.

रोमानिया सीमा ओलांडण्यासाठी प्रचंड रांगा होत्या. पोटात अन्नाचा कण नाही. घसा कोरडा पडलेला. अंगात त्राणही उरले नव्हते. अशा अवस्थेत 18 तास रांगेत उभे होतो. रोमानियाच्या सीमेत पोहोचले तेव्हा जिवात जीव आला. रोमानियात काहीच त्रास झाला नाही. एका फुटबॉल मैदानावर 3 दिवस ठेवण्यात आले. भरपेट खायला मिळाले. पाण्याची कमतरता भासली नाही. तेथून दिल्ली आणि मग मुंबईमार्गे नाशिकला आल्याचे ती म्हणाली. यावेळी उपस्थितांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते. श्रद्धा एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असून, युक्रेनमधील परिस्थिती निवळल्यास पुन्हा तेथे जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तिची तयारी आहे.

हेही वाचा :

Back to top button