धुळे : विद्यार्थ्याला जबर मारहाण ; बाल न्याय मंडळाने दिली ‘ही’ अनोखी शिक्षा | पुढारी

धुळे : विद्यार्थ्याला जबर मारहाण ; बाल न्याय मंडळाने दिली 'ही' अनोखी शिक्षा

धुळे पुढारी वृत्तसेवा : खाजगी शिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्याला जबर मारहाण करणाऱ्या बालकास तीन महिन्यांपर्यंत महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यास मदत करण्याची शिक्षा धुळ्याच्या बाल न्याय मंडळाने दिली आहे. हाणामारी करणाऱ्या या बालकाला सामाजिक सेवेची शिक्षा देत असतानाच त्याचे शिक्षण पाहता त्याचे पुनर्वसन करण्यासाठीची संधी मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. या बालकाला नर्सिंगचे प्रशिक्षण देण्यात यावे असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

धुळे येथील अग्रसेन महाराज पुतळ्याच्या जवळ एका खाजगी क्लासमध्ये 24 फेब्रुवारी 2017 रोजी हा प्रकार घडला होता. या क्लासमध्ये मस्करी करीत असताना बालकाचा आणि एका विद्यार्थ्याचा वाद झाला. हा वाद काही क्षणातच विकोपाला गेला. या वादानंतर संताप अनावर झालेल्या या बालकाने त्याच्या हातात असलेल्या धातूच्या कड्याने विद्यार्थ्यांच्या तोंडावर वार केला. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे चार ते पाच दात पडून तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलीस ठाण्यात भादवि कलम 325, 323 ,504 ,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी बाल न्याय मंडळाचे समोर अहवाल सादर केला. त्यानुसार बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष एस एन गंगवाल -शाह, सदस्य यशवंत हरणे व अनिता भांबेरे यांच्यासमोर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणांमध्ये सरकार पक्षाच्या बाजूने ऍड रसिका निकुंभ यांनी सात साक्षीदार तपासले.

बालकाच्या वतीने त्यांच्या विधीज्ञाने बालक व त्याच्या परिवारातील स्थिती न्याय मंडळासमोर मांडली. बालक हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करतो आहे. त्याच प्रमाणे काम करून बी. कॉम चे शिक्षण देखील घेतो. बालकावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. बालक हा त्याच्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असतानाच त्याच्या भविष्य घडवण्यासाठी शिक्षण देखील घेत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला विशेष ग्रहात ठेवण्याची शिक्षा देऊ नये. त्याला समज देऊन सोडण्यात यावे अशी विनंती केली. तथापी मंडळा समोर बालकाने हाणामारी केल्याचे आणि पुराव्यातून समोर आल्याने मंडळाने बालकाला दोषी ठरवले.

बालकांचे पुनर्वसन आणि बालकाचे कल्याण तसेच त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत त्याला पश्चाताप होण्यासाठी तसेच यापुढे तो अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही, अशी शिक्षा बालकाला देणे न्यायचीत ठरेल असे मत मंडळाने व्यक्त केले. बालकाच्या वकिलांनी तो सामाजिक सेवेचे काम करू शकतो अशी सहमती दर्शवली. तसेच बालकाने देखील त्याचा डीएमएलटीचा कोर्स झाला असून या विषयाशी संबंधित त्याला शिक्षा देण्यात यावी असे मंडळासमोर कथन केले.

त्यामुळे बालकांनी केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य समजण्यासाठी त्याला धुळे महानगरपालिकेच्या देवपूर परिसरातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी यांना मदत करण्याची शिक्षा सुनावली. या रुग्णालयात या बालकाने आठवड्यातील तीन दिवस प्रत्येकी दोन तास असे तीन महिन्यांपर्यंत जाऊन वैद्यकीय सेवेसाठी मदत करावी, असे आदेशात नमूद केले. वैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत बाल न्याय मंडळाला या बालकांच्या कामाचा अहवाल सादर करावा, असेही मंडळाने सुचवले.

बालकाच्या पुनर्वसनासाठी त्याला धुळ्याच्या जनशिक्षण संस्थान येथे नर्सिंगच्या प्रशिक्षणासाठी तीन महिन्याकरता पाठवण्याचा निर्णय देखील बाल न्याय मंडळाने घेतला आहे. या संस्थेच्या संचालिका तय्यब शेख इब्राहिम यांनी बालकाने तेथे घेतलेल्या शिक्षणाबाबत तर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मंडळाला अहवाल सादर करण्याचे आधी देखील देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Back to top button