Ravindra Jadeja : रविंद्र जडेजा ठरला नंबर 1 कसोटी अष्टपैलू!

Ravindra Jadeja : रविंद्र जडेजा ठरला नंबर 1 कसोटी अष्टपैलू!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. मोहाली कसोटीत चेंडू आणि बॅटने चमकदार कामगिरी करणारा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जगातील नंबर १ अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही टॉप-५ मध्ये परतला आहे. सध्या टीम इंडियाच्या ३ फलंदाजांचा टॉप १० मध्ये समावेश आहे.

सर जडेजा (Ravindra Jadeja) नंबर १ अष्टपैलू खेळाडू ठरला…

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना जडेजाने १७५ धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर त्याने सामन्याच्या दोन्ही डावात मिळून एकूण ९ विकेट घेतल्या. सर जडेजाने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात श्रीलंकेचे ४ खेळाडू बाद केले.

जडेजाने ४०६ रेटिंग गुणांसह तिसर्‍या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचवेळी होल्डर ३८३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आर अश्विनचे ​​नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहालीत ६१ धावा करण्यासोबतच अश्विनने ६ विकेट्सही घेतल्या.

कोहली टॉप ५ मध्ये परतला..

फलंदाजी क्रमवारीत विराट कोहलीला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. कोहली ७६३ रेटिंग गुणांसह ७व्या वरून ५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मोहालीत श्रीलंकेविरुद्ध १०० वी कसोटी खेळणाऱ्या विराटने पहिल्या कसोटीत ४५ धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा ७६१ गुणांसह सहाव्या क्रमांकावर कायम आहे. त्याचवेळी ऋषभ पंतने एका स्थानाच्या फायद्यासह ११व्या क्रमांकावरून १०व्या क्रमांकावर मजल मारली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात यष्टीरक्षक ऋषभ पंतने आक्रमक खेळी करताना अवघ्या ९७ चेंडूत ९६ धावा केल्या. रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन अव्वल स्थानावर कायम आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. केन विल्यमसनचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजीच्या क्रमवारीत कोणताही बदल नाही..

कसोटीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स ८९२ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनचे ​​८५० गुण आहेत. त्याच्याशिवाय भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह हा टॉप १० मध्ये असणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. बुमराहचे ७६३ गुण असून तो १०व्या स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news