धुळे : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या मदतीने तरुणाचा खून | पुढारी

धुळे : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या मदतीने तरुणाचा खून

धुळे पुढारी वृत्तसेवा : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचा प्रकार शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे घडला. मद्याच्या नशेत खून केल्याचे बरळल्याने मारेकरी पोलिसांच्या हाती लागले.

शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील मंगा उत्तम मोरे हा मद्याच्या नशेमध्ये बरळल्याने त्याने खून केला असल्याचे सोनगिरी पोलिसांना कळाले. त्यानुसार सोनगिर पोलिसांनी या माहितीची खातरजमा करून खून झालेले ठिकाण नरडाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळे नरडाणा पोलिसांना माहिती दिली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी तातडीने हालचाली करीत मंगा मोरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गावातील साहेबराव ऊर्फ साहेबु भीमराव मोरे (वय 42) याचा खून केल्याची माहिती दिली.

या खुनासाठी चेतन बारकु मोरे यांची मदत घेतल्याची माहिती देखील पुढे आली. मंगा मोरे यांनी 4 मार्च रोजी रात्री साहेबु मोरे याला वालखेडा शिवारातील  अखिल पिंजारी यांच्या शेताकडे नेले. शेतात गेल्यानंतर मंगा मोरे याने साहेबुशी वाद घालण्यास सुरुवात केली. मंगा मोरे यांनी पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन हा वाद घातला. तर चेतन मोरे याने साहेबु हा दोन लाख रुपये मागण्यासाठी तगादा लावत होता, यावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दोघांनीही साहेबु मोरे यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातच साहेबु मोरे चा मृत्यू झाला.

या घटनेची कुठेही वाच्यता न करता दोघेही मारेकरी गावात काही झालेच नसल्याचा अविर्भाव बाळगून फिरत होते. मात्र मद्याच्या नशेत मंगा मोरे हा खून केल्याची बाब बरल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नरडाना पोलिसांनी मारेकर्‍यांना ताब्यात घेतल्यानंतर उपविभागीय अधिकारी अनिल माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी अखिल पिंजारी यांच्या शेतातून रात्री उशिरा साहेबु मोरे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर मयताची आई विमलबाई भिमराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगा मोरे आणि चेतन मोरे या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button