ना. नारायण राणे यांच्या उपस्थितीत नाशिकला 1 मार्चला आयटी कंपन्यांची परिषद | पुढारी

ना. नारायण राणे यांच्या उपस्थितीत नाशिकला 1 मार्चला आयटी कंपन्यांची परिषद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महापौर सतीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतील ’आयटी पार्क’ संदर्भात केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये दि. 1 मार्च रोजी आयटी कंपन्यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात महापालिका काही आयटी कंपन्यांबरोबर करार करणार असून, आयटी हब साकारणारी नाशिक महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला.

महापौर कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, भाजप उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके तसेच महापालिकेतील नगररचना सहायक संचालक हर्षल बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 14) मुंबईत आयटी पार्कविषयी ना. राणे यांची भेट घेतली होती. मंगळवारी (दि. 15) महापौरांनी ’रामायण’ या निवासस्थानी संयुक्त पत्रकार परिषद घेत आयटी कंपनीच्या परिषदेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, नाशिक शहरातील युवकांना रोजगारासाठी मुंबई, पुणे, बंगळुरू येथील आयटी कंपन्यांमध्ये जावे लागते. भूमिपुत्रांना नाशिकमध्येच रोजगार उपलब्ध व्हावा आणि शहराचीही भरभराट व्हावी, या उद्देशाने 2012 मध्ये मी उपमहापौर असताना संकल्पना व्यक्त केली होती.

त्यानुसार आता महापौर असताना ही संकल्पना आडगाव शिवारात प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद होत असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. दि. 1 मार्च रोजी होणार्‍या परिषदेत सुमारे 100 हून अधिक आयटी कंपन्या सहभागी होतील, असा अंदाज उद्योग आघाडीचे पदाधिकारी प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, भाजप गटनेते अरुण पवार आदी उपस्थित होते.

335 एकरवर आयटी पार्क
आयटी हबसाठी महापालिकेने मागविलेल्या स्वारस्य देकारनुसार 335 एकर क्षेत्रावर पार्क उभे राहू शकते. संबंधित जागामालकांनी 33 वर्षांच्या भाडेतत्त्वावर जागा देण्यास लेखी संमती दर्शविली असून, आयटी डेव्हलपरच्या माध्यमातून आयटी हबची उभारणी केली जाणार असल्याचे पेशकार यांनी सांगितले. भाडेकरारसंदर्भात महापालिका आणि आयटी डेव्हलपर कंपनीबरोबर करार केला जाणार आहे. डेव्हलपर कंपनीमार्फत आयटी कंपन्यांना भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिली जाईल आणि जागामालकांना जागेचे भाडे दिले जाणार असल्याचे स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी सांगितले.

आयटी पार्कसाठी भूसंपादन नाही
आयटी हबसाठी महापालिका रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज यांसारख्या पायाभूत सुविधा उभारणार आहेत. आयटी पार्कच्या माध्यमातून आयटी कंपनींकडून प्रीमियम शुल्कापोटी मनपाला सुमारे 300 कोटींचा महसूल प्राप्त होईल. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी या कराव्दारेदेखील महसूल मिळणार असून, आयटी पार्कसाठी कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करणार नसल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button