धुळे : गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथक तैनात | पुढारी

धुळे : गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथक तैनात

धुळे पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील नवलनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तिघा चोरट्यांच्या शोधासाठी तालुका पोलिसांनी पथक तयार केली आहेत. तसेच या भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान रखवालदार नसल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगितले जाते आहे.

धुळे तालुक्यातील नवल नगर येथे स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरच्या शटरच्या कुलुपाचे हुक अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या माध्यमातून कापले. यानंतर सेंटरमध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान पोलिसांची गस्तीची गाडी आल्याचा भीतीने या चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.

सकाळी बँकेचे मॅनेजर आणि कर्मचारी यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानुसार त्यांनी तालुका पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिघा तरुणांनी केल्याची बाब फुटेजमधून लक्षात आली आहे. त्यामुळे या चोरट्यांच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून या भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे.

दरम्यान धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात महामार्गालगत असणाऱ्या अनेक गावांमध्ये एटीएम चोरीचे प्रकार घडले आहेत. या सर्व एटीएम सेंटरच्या बाहेर रखवालदार नसल्यामुळे हा प्रकार झाल्याची बाब यापूर्वीच निदर्शनास आली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने संबंधित बँक प्रशासनाला अनेक वेळेस पत्र देऊन, कळवून देखील एटीएम सेंटरवर रखवालदार ठेवला जात नसल्याने चोरी सारख्या घटना घडत असल्याची प्रतिक्रिया आहे.

हेही  वाचा :

Back to top button