गेवराई : चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी एकाला अटक; तीन जण फरारच | पुढारी

गेवराई : चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी एकाला अटक; तीन जण फरारच

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील शहाजाणपूर चकला येथील सिंदफना नदी पात्रात अवैध वाळू उपसा केेलेल्या खड्यात चार बालके पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तांदळवाडी येथील चार वाळू माफियांविरोधात सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा गेवराई पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यातील एका आरोपीला पाचोड (जि.औरंगाबाद) येथून शनिवार रोजी रात्री अटक करण्यात यश आले. मात्र  तिघे जण अजूनही फरार आहेत.

तालुक्यातील शहाजानपूर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर यांचे मृतदेह सिंदफना नदी पात्र वाळू उपसाने पडलेल्या खड्यात आढळून आला. याप्रकरणी वाळू माफियाविरोधात कारवाई करावी, अशा मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला होता.

या प्रकरणी गेवराई महसूल, बीड महसूल विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतले होते. हे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. त्यानंतर गुरुवार 10 फेब्रुवारी रोजी गेवराई पोलीस ठाण्यात  या प्रकरणी चार जणांविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील संदिपान हनुमान निर्मळ (वय- 28 रा. तांदळवाडी) याला गेवराई पोलिसांनी पाचोड जिल्हा औरंगाबाद येथून शनिवार रोजी रात्री अटक केली. ही कारवाई सपोनि संदीप काळे, राजाभाऊ गर्जे यांनी केली.संदिपान निर्मळ याला न्‍यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. फरार असणारे पांडुरंग चोरमले, विलास निर्मळ,अर्जून कोळेकर या तिघांचा पाेलिस शाेध घेत आहेत.

सदरील प्रकरणी असणारे तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ते देखील लवकरात लवकर पकडले जातील

– संदीप काळे, सपोनि गेवराई

Back to top button