नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात नातेवाइकांची चौकशी | पुढारी

नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात नातेवाइकांची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खून प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. शनिवारी (दि.5) वाडीवर्‍हे पोलिसांनी डॉ. वाजे यांच्या सासरच्या व माहेरच्या नातेवाइकांचे जाबजबाब नोंदवून घेतले आहेत. त्यात माहेरच्या नातेवाइकांनी डॉ. वाजे यांच्या पतीनेच खून केल्याचा आरोप केला आहे. संशयित आरोपी संदीप वाजे याला गुन्ह्यात साथ देणार्‍या अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे.

सिडको येथील मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत डॉ. सुवर्णा संदीप वाजे (38, रा. कर्मयोगीनगर) या मंगळवारी (दि. 25) रात्रीपासून बेपत्ता झाल्या होत्या. पोलिस तपासात पती संदीप वाजे यानेच डॉ. सुवर्णा यांचा खून केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वाडीवर्‍हे पोलिस ठाण्यात संदीप विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संदीप वाजे यास खुनात इतर आरोपींनीही साथ दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांचाही शोध सुरू केला आहे. दरम्यान, शनिवारी पोलिसांनी वाजे यांच्या नातेवाइकांसह अन्य काही नातेवाइकांचेही जबाब नोंदवले. यात डॉ. सुवर्णा वाजे यांच्या नातेवाइकांनी डॉ. सुवर्णा व संदीप वाजे यांच्यात कौटुंबिक वादाचे दाखले देत संदीप यानेच खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मारेकर्‍यांनी थंड डोक्याने कट रचून खून केल्याचे उघडकीस आले आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेपूर काळजी घेतल्याचेही पोलिस तपासात समोर येत आहे. त्यामुळे या खुनाचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी ग्रामीण पोलिस घटनेचे नाट्य रूपांतर (क्राइम सीन) करणार आहेत. मात्र, पोलिस महासंचालक संजय पांडे हे नाशिकमध्ये आले असल्याने क्राइम सीनसाठी आवश्यक वेळ मिळाला नाही. त्यामुळे रविवारी (दि.6) मोरवाडी ते कर्मयोगीनगर, तेथून पाथर्डी फाटा मार्गे रायगडनगरजवळील घटनास्थळापर्यंत क्राइम सीन करून घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button