नाशिक : मला चपराशी समजताय का? पोलिस आयुक्तांनी सेेना पदाधिकार्‍यांना खडसावले

नाशिक : मला चपराशी समजताय का? पोलिस आयुक्तांनी सेेना पदाधिकार्‍यांना खडसावले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या नगरसेवकांना तडीपारीबाबत नोटिसा बजावल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांची भेट घेण्यास गेले. मात्र, तडीपारी कारवाई व पक्षीय कार्यक्रमाच्या परवानगीवरून पोलिस आयुक्तांनी संताप व्यक्त केला. 'तुमच्या बोलण्यावरून मी चपराशी वाटतोय' अशा शब्दांत पोलिस आयुक्तांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना सुनावले. या चर्चेदरम्यान, शिवसेनेच्या अंतर्गत वादाचेही पडसाद बाहेर आले.

महापालिका निवडणुकीची रंगत सुरू होताच, पोलिसांनी शिवसेना नगरसेवकांना तडीपार करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, नोटिशीत तडीपारीसाठी ज्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी दिली आहे, ती राजकीय आंदोलनाची असल्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह इतर पदाधिकारी व नगरसेवक पोलिस आयुक्तालयात गेले होते. मात्र, पोलिस महासंचालकांचा दौरा असल्याने पाण्डेय यांनी भेट नाकारली, तरीही पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्तांना गाठत कारवाईबाबत चौकशी केली. यावेळी चौधरी यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चुकीच्या पद्धतीने तडीपारीची नोटीस बजावल्याचे सांगितले.

त्यावर पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी यासंदर्भात माहिती घेऊन उचित कारवाई करू, असे सांगितले. यावेळी चर्चेतून स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान कार्यक्रमापासून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाबही उघड झाली. या कार्यक्रमात पोलिसांनी व्यत्यय कसा आणला, अशी तक्रार विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली.

त्यावर पाण्डेय यांनी संबंधित कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा विषय माझ्यासमोर परवानगीसाठी ठेवला नसल्याचा दावा केला. त्यावर बोरस्ते व करंजकर यांनी शिवसेनेकडून संबंधित कार्यक्रमासाठी परवानगी मागितल्याचा दावा केला. संबंधित कार्यक्रमांची यादी महानगरप्रमुख बडगुजर यांनी पाठविली असल्यामुळे व तेदेखील या ठिकाणी उपस्थित असल्याने त्यांनाच जाब विचारा, असे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले, तर संबंधित कार्यक्रमाची माहिती पोलिसांना कळविल्याचा दावा बडगुजर यांनी केला.

यामुळे तो कार्यक्रम उधळून लावण्याचा डाव कोणी खेळला, असा प्रश्नही सर्वांना पडला. या संभाषणादरम्यान विजय करंजकर यांनी पाण्डेय यांना, साहेब, तुम्ही शिवसेनेच्या अन्य पदाधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेत जा, असे सांगितले. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी संताप व्यक्त करीत, तुमच्या बोलण्यावरून मी चपरासी वाटतोय, अशा शब्दांत कानउघाडणी केली, तर आम्ही तुम्हाला चपरासी बोललोच नाही, असा दावा करंजकर यांनी केला.

यावरून चर्चा बिघडली : 'मी तुमच्यासोबत प्रेमाने बोलतोय आणि तुम्हाला असे वाटतेय मी चपरासी आहे' असा दावा पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी केला. त्यावर करंजकर यांनी, आम्ही तुम्हाला चपरासी बोललोच नाही, असे सांगितले. मात्र, तुमच्या बोलण्यावरून असे वाटतेय. तु्म्ही व्हिडिओ बघा. माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याशी उद्धटपणे बोलताय, हे योग्य आहे का? मी काय चुकीचे करतोय? असे प्रश्नही पोलिस आयुक्तांनी करंजकर व इतर पदाधिकार्‍यांना विचारले.

शिवसैनिकांना तडीपारीबाबत दिलेल्या नोटिसांसंदर्भात पोलिस आयुक्तांना शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेले होते. नोटिसांबाबत फेरविचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. नोटिसा दिलेले शिवसैनिक तसेच नगरसेवकावर राजकीय गुन्हे आहेत. यामुळे योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी विनंती केली असून, चर्चेदरम्यान गैरसमज झाला होता. तोही दूर झाला आहे.
– भाऊसाहेब चौधरी,
जिल्हासंपर्क प्रमुख, शिवसेना

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news