नाशिक : बीओटी’च्या नावाखाली ‘ते ’11 भूखंड बिल्डरांच्या घशात ; सत्तारुढ भाजपचा खटाटोप | पुढारी

नाशिक : बीओटी’च्या नावाखाली 'ते '11 भूखंड बिल्डरांच्या घशात ; सत्तारुढ भाजपचा खटाटोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : ‘बीओटी’च्या नावाखाली शहरातील मोक्याच्या ठिकाणचे 11 भूखंड सत्तारूढ भाजपने विरोधानंतरही बिल्डरांच्या घशात घालण्याचा खटाटोप सुरू केला आहे. गंगापूर रोडवरील कोट्यवधी रुपये किमतीचे व पब्लिक अ‍ॅमिनिटीजसाठी राखीव असलेले दोन भूखंड बीओटीच्या नावाखाली विकसित करण्यासाठी बांधकाम विभागाने निनाविदाही प्रसिद्ध केली आहे. या दोन्ही भूखंडांवर पब्लिक अ‍ॅमिनिटीजच्या नावाखाली शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले जाणार असून, त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळणार असल्याचा पोकळ दावा केला जात असल्याचा आरोप आता केला जात आहे.

शहरातील महात्मा फुले मार्केट, बी. डी. भालेकर हायस्कूल, भद्रकाली मार्केटसह पब्लिक अ‍ॅमिनिटीजचे 11 राखीव भूखंड बीओटी तत्त्वावर देण्याचा अशासकीय ठराव 19 जानेवारी 2021 च्या महासभेत मागच्या दाराने पारित केला आहे. विशिष्ट बिल्डरांना डोळ्यासमोर ठेवून हा ठराव मंजूर केल्यानंतर निविदा प्रक्रिया न राबवताच ‘कमलेश कन्सल्टंट अ‍ॅण्ड देवरे-धामणे आर्किटेक्ट’ या संस्थेची सल्लागार म्हणून केलेली नियुक्ती वादात सापडली होती. धक्कादायक बाब म्हणजे अशासकीय ठरावावर अंमलबजावणी न करणार्‍या प्रशासनानेदेखील या प्रस्तावाला चाल दिल्याने संशय बळावला होता. विशिष्ट बिल्डरांसाठीच ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला होता. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह सत्तारूढ भाजपमधील नगरसेवकांनीदेखील याला विरोध केला होता.

या ठरावाचे इतिवृत्त मंजूर नसतानाही, त्याला दिली जाणारी चाल संशयास्पद आहे.या बीओटीमुळे पालिकेचे कोट्यवधीचे नुकसान होणार असल्यामुळे मनसेचा तीव— विरोध असून, यासाठी 25 जानेवारी रोजीच पत्र देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.
– सलीम शेख, नगरसेवक, मनपा

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button