पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये ; स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे होणार भूमिपूजन | पुढारी

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये ; स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे होणार भूमिपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर व विचारशैलीवर आधारित बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे भूमिपूजन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) दुपारी अडीच वाजता होणार आहे.

या उद्यानाच्या भूमिपूजन सोहळ्यास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह कृषिमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे जिल्हा व शहर पदाधिकारी तसेच मनपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्मृती उद्यानाची संकल्पना मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांची असून, बाळासाहेब ठाकरेंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व व त्यांच्या विचारांशी जनसामान्यांची जुळलेली नाळ विचारात घेऊन त्यांचे विचार हे पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने या स्मृती उद्यानाची रचना आहे.

बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालयाच्या उर्वरित जागेचा कल्पकतेने वापर करीत, या उद्यानात प्रामुख्याने बाळासाहेबांनी काढलेल्या काही व्यंगचित्रांची आर्ट गॅलरी, त्यांच्या भाषणाच्या ध्वनिफिती, चित्रफिती व मुलाखतींचा अमूल्य ठेवा असलेले दालन असणार आहे. तसेच, त्यांचे नाट्य व एकांकिकांविषयीचे प्रेम विचारात घेता, त्यावर आधारित सुसज्ज 200 आसनी ऑडिटोरियम या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. कोणत्याही विषयावर मुक्त संवाद साधण्यासाठी हाइड पार्कच्या धर्तीवर जागेचा विकासदेखील केला जाणार आहे. तसेच, वाचनालय व ई-वाचनालयाची निर्मिती, अ‍ॅडव्हेंचर पार्क तसेच नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत.

या उद्यानाला गोदा किनार्‍याचा भाग असल्याने त्याचाही विकास होत असल्याने गोदा किनार्‍याचेही सुशोभीकरण होणार आहे. हे उद्यान केवळ मनोरंजन व विरंगुळ्यापुरते मर्यादित न राहता, यातून चांगले वक्ते, कलाकार, खेळाडू, साहित्यिक, इतिहासाचे संशोधक उदयास येतील व यामुळे नाशिक शहराचे पर्यटनदेखील वाढेल व हीच खरी बाळासाहेब ठाकरे यांना खर्‍या अर्थाने आदरांजली असेल, असे अजय बोरस्ते यांनी सांगितले.

या स्मृती उद्यानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले असून, महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, आयुक्त कैलास जाधव यांनी याकामी निधी मंजूर करीत सहकार्य केले आहे. नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बोरस्ते यांनी केले आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button