बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद; किरपे गावातील घटना; वनविभागाने हलवले सुरक्षित स्थळी | पुढारी

बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद; किरपे गावातील घटना; वनविभागाने हलवले सुरक्षित स्थळी

कराड : पुढारी वृत्तसेवा
मागील आठवड्यात पाच वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी किरपे परिसरात सापळा लावला होता. या सापळ्यात बिबट्या अडकल्याचे बुधवारी सकाळी समोर आले. वनविभागाने संबंधित बिबट्याला सुरक्षितस्थळी हलवले आहे.

मागील दोन महिन्यात येणके व किरपे या दोन लगतच्या गावात बिबट्याने दोन मुलांवर हल्ला केला आहे. यात दोन महिन्यापूर्वी ऊस तोडणी मजुराच्या मुलाचा दुर्दैवीरित्या बळी गेला होता. त्याचप्रमाणे मागील आठवड्यातही बिबट्याने राज देवकर या चिमुकल्यावर त्याच्या वडिलांसमोरच हल्ला केला.यावेळी मुलाच्या वडिलांनी मोठ्या धाडसाने बिबट्याशी दोन हात करत आपल्या मुलाचे प्राण वाचवले. संबंधित गंभीर जखमी मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण किरपे – तांबवे परिसर दहशतीच्या छायेखाली असल्याचे दिसते. यापूर्वीही तांबवे परिसरात बिबट्याने मानवावर हल्‍ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र मागील दोन महिन्यातील घटनांमुळे संपूर्ण परिसर अक्षरशः हादरला आहे.

त्यामुळेच स्थानिक ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीकडून बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. या सापळ्यात मंगळवारी रात्री बिबट्या अडकला. ही घटना बुधवारी सकाळी समोर आल्यानंतर वनविभागाने बिबट्याला तेथून सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र असे असले तरी या परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर असून त्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button